मालक, आम्हाला असं वाऱ्यावर सोडू नका; कामगारांची पगारासाठी विनवणी

श्रीनिवास दुध्याल
Friday, 15 May 2020

कोरोना व लॉकडाउनमुळे सर्व दुकाने बंद आहेत. अशा परिस्थितीत पगाराविना आमचा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. आपल्याच दुकानात काम करतोय, जिभेवर आपला संसार ठेवून ग्राहकाला कपडे घेण्यासाठी पटवतोय, मात्र आज भयंकर संकटात सापडलो आहोत. आपल्या हातावर जगणाऱ्या बायकापोरांच्या भुकेकडे पाहिलं तर डोळ्यातील पाण्याला सावरत तोंड लपवतोय.

सोलापूर : कोरोना व लॉकडाउनमुळे सर्व दुकाने बंद आहेत. अशा परिस्थितीत पगाराविना आमचा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. आपल्याच दुकानात काम करतोय, जिभेवर आपला संसार ठेवून ग्राहकाला कपडे घेण्यासाठी पटवतोय, मात्र आज भयंकर संकटात सापडलो आहोत. आपल्या हातावर जगणाऱ्या बायकापोरांच्या भुकेकडे पाहिलं तर डोळ्यातील पाण्याला सावरत तोंड लपवतोय. तरी आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. आम्ही अभिमानाने सांगतो, की एक वेळ कोरोना मला मारेल पण माझा मालक मला जगवेल. त्यामुळे मालक, आम्हाला पगार न देता असे वाऱ्यावर सोडू नका, अशी आर्त विनवणी कापड दुकानांतील कामगारांनी केली.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लि करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून शहरातील कापड दुकाने, शोरूम बंद आहेत. मार्च महिन्यातील पगार काही दुकानदारांनी दिला तर काहींनी नाही. एप्रिल महिन्याचा पगार तर मिळालाच नाही. त्यामुळे शहरातील जवळपास चार ते पाच हजार सेल्समन व त्यांचे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत त्यांनी मालकांना पगारासाठी विनंती केली आहे.
कामगार म्हणतात, मालक, आम्हाला माहीत आहे की ऐन लग्न सीझनमध्ये आपले फार मोठे नुकसान झाले आहे. पण आज नाही तर उद्या दुकानं चालू होतील तेव्हा हेच कामगार व्यवसाय वाढविण्यासाठी मेहनत घेतील. झालेले नुकसान पुन्हा भरून काढतील. पण कामगारांची सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे. एका कमावत्या कामगारावर त्याचे पूर्ण कुटुंब अवलंबून असते. बायको, वयस्कर आईवडील व मुलांना जगवण्यासाठी अन्नधान्य, औषधांचा खर्च, संपलेले सिलिंडर हा खर्चाचा भाग आहे. पगारच नाही तर जगावं की मरावं हेच कळत नाही. जर या कठीण परिस्थितीत कोणाचं काही बरेवाईट झालं तर त्याला जबाबदार कोण?

हेही वाचा : महत्त्वाची माहिती : सोलापूरचे नाव सोलापूरच का? जाणून घ्या   
याबाबत सोलापूर कापड व्यापारी नोकर संघटनेने कामगारांना न्याय मिळण्यासाठी ठोस पाऊल उचलले असून, मार्च, एप्रिल, व मे महिन्याचा पूर्ण पगार मिळावा यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले. सोलापूर कापड व्यापारी नोकर संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर ईडप, सचिव हरिदास बोड्डू व प्रसिद्धीप्रमुख व्यंकटेश डोंतुल यांनी सोलापूर कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष शांतिकुमार दोशी यांना समक्ष भेटून निवेदन दिले. 

बंद काळातील पगार मिळावा
काही मालकांनी कामगारांची अडचण लक्षात घेऊन पगारपोटी अनामत रक्कम दिली आहे. सोलापूर कापड व्यापारी नोकर संघटना ही कुठल्याही मालक व दुकानाविरुद्ध नाही. केवळ मालक व कामगार यांच्यामध्ये विषमता निर्माण होऊ नये व कामगारांना बंद काळातील पूर्ण पगार मिळावा, हेच आमचे धोरण आहे. आम्हाला आशा आहे की मालक कामगारांना निराश होऊ देणार नाहीत.
- मुरलीधर ईडप, अध्यक्ष, सोलापूर कापड व्यापारी नोकर संघटना

मालकांना आवाहन करणार
कामगारांचे निवेदन मिळाले आहे. याबाबत मालकांना मेसेज पाठवले आहेत. लॉकडाउनमुळे व्यवसाय नाही, विक्री नाही, उधारीची वसुली नाही, हातात रोख रक्कम नाही त्यामुळे मालकांचीही मोठी अडचण झाली आहे. तरी काही मालकांनी अनामत रक्कम दिली आहे. मी मालकांना आवाहन करणार आहे. कामगारांनीही परिस्थिती ओळखावी.
- शांतिकुमार दोशी, अध्यक्ष, सोलापूर कापड व्यापारी संघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown period demand of workers to employers payment