कोरोना : सूर्यनारायणाचा असह्य चटका, विनाकारण फिरणाऱ्यांना झटका! (Video)

Tilak Chowk
Tilak Chowk

सोलापूर : सध्या सुरू असलेल्या संचारबंदीचा धसका नागरिकांत म्हणावा तसा दिसून येत नाही. संचारबंदीतही नागरिक पहाटेपासून दुपारी 12 पर्यंत रस्त्यावर दिसून येत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्यांमुळे पोलिसांना धावपळ करत, प्रसंगी दंडुका वापरत त्यांच्यावर कारवाई करावी लागत आहे. मात्र, ही कारवाई सरसकट सर्वच ठिकाणी दिसून येत नसल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी सकाळी दिसून येत आहे. चौका-चौकात बंदोबस्तासाठी थांबलेल्या पोलिसांनाही हतबल होऊन त्यांच्याकडे नुसते पाहात उभारावे लागत आहे. मात्र, दुपारी सूर्यनारायणाने उन्हाचा चटका वाढवल्यामुळे विनाकारण फिरणारे घरातच अडकून पडत असल्याने रस्ते व चौक मोकळा श्‍वास घेत आहेत.

दुपारी बंदोबस्तावरील पोलिस रिलॅक्‍स
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या शहरातील संचारबंदीला मात्र नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शहर पोलिसांनी काल (रविवार) पासून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त केली आहेत. त्याचा परिणाम सोमवारी बऱ्याच प्रमाणात दिसून आला आहे. तरीही महत्त्वाचे चौक सोडले तर शहरातील झोपडपट्टी व हद्दवाढ भागात नागरिकांचा बिनकामाचा वावर अद्यापही दिसून येत आहे. अशांवर कारवाई करण्यासाठी पोलिस कमी पडत आहेत. मात्र, पोलिसांच्या मदतीला सूर्यनारायण धावून आला आहे. सूर्यनारायणाच्या रुद्रावतारापुढे विनाकारण फिरणारे घामाघूम होत असून, रस्त्यावर येण्याचे धाडस करीत नसल्याने शहरातील सर्वच रस्ते व चौक सामसूम दिसून येत आहेत. सगळीकडे शांतता पसरत आहे. चौकांतील बंदोबस्तावरील पोलिस मात्र यामुळे रिलॅक्‍स झाल्याचे दिसून आले.

सायंकाळी नागरिक पुन्हा रस्त्यावर
सायंकाळी सूर्यनारायण निरोप घ्यायच्या वेळी उन्हाचा चटका सौम्य होत गेला. त्यामुळे उनाड तरुणांचे लोंढे पुन्हा हळूहळू घराबाहेर पडत होते. कोणी चौकांमध्ये, रस्त्यांवर तसेच गल्लीबोळात गटागटाने "वैचारिक' गप्पा मारण्यात दंग झाल्याचे दिसून आले. कोणी विनाकारण दुचाकीवरून फेरफटका मारत होते. आता पोलिसांनीही दुपारी विश्रांती घेऊन सकाळी व सायंकाळी कारवाई तीव्र करण्याची वेळ आली आहे.

दुपारची संचारबंदी 95 टक्के यशस्वी!
सकाळी व सायंकाळी संचारबंदीला हरताळ फासणारे नागरिक दुपारी उन्हाच्या चटक्‍यामुळे घराबाहेर पडत नसल्याने रस्त्यांवर चिडीचूप शांतता दिसून आली. सर्वजण आपापल्या घरात बसल्याने दुपारच्या संचारबंदीला 95 टक्के यश मिळते आहे. कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी नागरिकांनीही घराबाहेर पडणार नाही, असे ठरवल्यास सोलापुरात कोरोनाचा शिरकाव होऊच शकणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com