आई-वडील अन्‌ मुलांत लॉकडाउन काळ होऊन उभा 

विजयकुमार कन्हेरे 
Tuesday, 28 April 2020

गावाकडे मुले एकटीच 
गावातील घरी कोणीही नसल्याने मुले शेजारी व परिसरातील नागरिकांकडे राहत आहेत. मुलांचा दररोज फोन येतो, ती फोनवर रडतात, लवकर या म्हणतात, केव्हा येणार हे विचारतात. परंतु, आम्हाला काही करता येत नसल्याचे सांगताना राठोड यांच्या डोळ्यात पाणी आले होते. 

कुर्डुवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) :"हमार छिचापर घर वाट देख रहेज... हमे घरनज जाय दो....' या बोलीभाषेतील शब्दात कुर्डुवाडी येथील शेल्टर होममध्ये असलेल्या तुकाराम राठोड व सविता राठोड या दांपत्याने भावनांना वाट मोकळी करून दिली. मागील अनेक दिवसांपासून आई-वडील अन्‌ त्यांच्या मुलांत लॉकडाउन काळ होऊन उभा आहे. मुले एकटी गावी कशी राहात असतील याची या दांपत्याला चिंता लागून आहे. 
संचारबंदी काळात नांदेड जिल्ह्यातील हे मजूर दांपत्य कुर्डुवाडी येथील शेल्टर होम येथे आहेत. परंतु, मूळगावी त्यांची दोन लहान मुले एकटीच आहेत. या लहान मुलांची आठवण व काळजीने भावनाविवश होऊन ते बोलत होते. मागील अनेक दिवसांपासून मुले व आइ-वडील एकमेकांपासून शेकडो किमी अंतरावर दूर राहात आहेत. मुले काय करत असतील, व्यवस्थित खात असतील का, या असल्या कोरोना पार्श्‍वभूमीवर स्वत:ची काळजी घेत असतील का.. अशा एक ना अनेक विचारांमुळे त्या दांपत्याचे डोके सुन्न होत आहे. 
बांधकाम क्षेत्रात मजूर म्हणून काम करणारे हे दांपत्य मूळचे आबदीनगर तांडा (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील असून ते सुमारे दीड महिन्यांपूर्वी इंदापूरजवळ असलेल्या एका गावात मजुरीसाठी गेले होते. त्यांना संध्या (इयत्ता सातवी, वय 13 वर्षे) व संदीप (इयत्ता सहावी, वय 12 वर्षे) ही दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले मुखेड या ठिकाणी शाळेसाठी वसतिगृहात राहत होते. तुकाराम राठोड म्हणाले, लॉकडाउन, संचारबंदीने शाळेला सुटी असल्याने ती दोन्ही मुले गावी परत आली. परंतु, आम्ही कामावरून गावी परतत असताना कुर्डुवाडी परिसरात अडकलो. येथील शेल्टर होम येथे थांबवले आहे. राहणे व खाण्याची सुविधा आहे. परंतु, मुले गावी आहेत. गावातील घरी कोणीही नसल्याने मुले शेजारी व परिसरातील नागरिकांकडे राहत आहेत. मुलांचा दररोज फोन येतो, ती फोनवर रडतात, लवकर या म्हणतात, केव्हा येणार हे विचारतात. परंतु, आम्हाला काही करता येत नाही. त्यांना समजावून सांगतो की लवकर आम्ही परत येऊ. आम्हा दोघांना मुलांची खूप आठवण येते. कशातही लक्ष लागत नाही. मुलांची आई तर सतत रडते, असे सांगताना श्री. राठोड यांच्याही डोळ्यांत पाणी आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown stand in Parents and children