
सोलापूर : ""संपूर्ण विश्वाला मानवतेचा, प्रेमाचा, मैत्रीचा, करुणेचा, समतेचा, विश्वबंधुतेचा संदेश देणारे विश्वशांती दूत तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणजेच बुद्ध पौर्णिमा होय. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गानुसार आचरण ठेवल्यास विश्वशांती शक्य आहे. स्त्रियांना दीक्षेचा अधिकार देणारा बौद्धधम्म हा इतिहासातील पहिला धर्म आहे,'' असे प्रा. डॉ. सिद्राम सलवदे यांनी सांगितले. उद्या (गुरुवारी) भगवान बुद्धांची जयंती. त्यानिमित्त प्रा. सलवदे यांच्याशी साधलेला संवाद.
प्रा. सलवदे म्हणाले, ""लहानपणापासूनच सिद्धार्थ गौतम विचारशील होते. सदैव एकांतात बसून ते जगातील चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल विचार करीत असत. ते नेहमी मनाला विचारायचे की, मनुष्य रोगाने त्रस्त का होतो? मनुष्य म्हातारा का होतो? मनुष्याला मरण का येते? या सर्व दु:खी घटनांना टाळण्याचा एखादा मार्ग सापडू शकेल काय? याचा ते सतत विचार करीत होते. मनुष्य मनुष्याचे शोषण का करतो? समाजामध्ये विषमता का आहे? स्वत:च्याच जाळ्यात गुरफटलेला मनुष्य कधी मुक्त होईल? मनुष्याची दयनीय व करुण अवस्था बघून सिद्धार्थ गौतमाचे मन द्रवित झाले. वयाच्या 28व्या वर्षी सर्व ऐश्वर्य सोडून सिद्धार्थ गौतम मानवासाठी मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी घराबाहेर पडले.''
""निरंजना नदीच्या किनारी एका पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांनी सतत सहा वर्षे तपस्या केली. इ.स. पूर्व 528 मध्ये वयाच्या 35व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला बौद्धगयामध्ये पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झाले आणि सिद्धार्थ बुद्ध झाले. बुद्धांच्या मते, दु:खाचे कारण तृष्णा हेच आहे. तृष्णा म्हणजे इच्छांचे विकृत रूप. याच तृष्णेमुळे राग आणि आसक्ती वाढते. तृष्णेच्या नाशात खरे सुख दडलेले आहे. भगवान बुद्धांनी पंचशीलाच्या आचरणावर भर दिला. हिंसा करू नये, चोरी, कामवासनेपासून दूर राहावे, खोटे न बोलणे, वाईट पदार्थांचे सेवन न करणे हेच सदाचरण आहेत. यालाच पंचशील म्हटले जाते. मनुष्याला दु:खापासून मुक्ती मिळवता येते, असेही भगवान बुद्धांनी सांगितले होते,'' असे प्रा. सलवदे म्हणाले.
जगाला आज बुद्धांच्या विचारांची गरज
बुद्धांच्या मते, निसर्ग भेदभाव करीत नाही तर मग माणसा-माणसात भेदभाव कशासाठी? बुद्धांनी स्वत:ला देवाचा प्रेषित असल्याचा किंवा देवाचा दूत असल्याचा दावा कधीही केला नाही. जगाला आज बुद्धांच्या विचारांची गरज आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा अभ्यास करून बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.
- प्रा. डॉ. सिद्राम सलवदे,
वालचंद महाविद्यालय, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.