"मास्तरां'च्या संघर्षाला प्रेमाची किनार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

माकपचे नरसय्या आडम 1977 मध्ये वाडिया हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना कामिनी यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली. गरीब व कष्टकऱ्यांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व व चळवळी नेतृत्वामुळे कामिनी यांच्या मनामध्ये मास्तरांविषयी आदर व प्रेम निर्माण झाले. त्यांच्यात एक घनिष्ठ नाते निर्माण झाले. पुढे त्याचे प्रेमात रूपांतर झाले.

सोलापूर : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सध्याचे राज्य सचिव तथा केंद्रीय कमिटी सदस्य नरसय्या आडम यांच्या संघर्षमय जीवनाला 1977 मध्ये कामिनी आडम यांच्या रूपाने एक प्रेमाची किनार मिळाली. आज 43 व्या वर्षीही राजकीय व चळवळीच्या मार्गावर त्यांच्या प्रेमाची साक्ष देत आहे.

हेही वाचा - शाळा अनुदानाचा विषय मेपूर्वी संपणार

1977 मध्ये अडकले विवाहबंधनात
श्री. आडम 1977 मध्ये वाडिया हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना कामिनी यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली. त्या वेळी कामिनी या नुकत्याच परिचारिका म्हणून सरावासाठी वाडियामध्ये दाखल झाल्या होत्या. त्या वेळी त्यांना 17 रुपये 50 पैसे विद्यावेतन मिळत असे. हे विद्यावेतन तुटपुंजे असल्याने तेव्हा मास्तरांनी परिचारिकांना संप करायला सांगितले होते. या संपाला यश मिळून 22 रुपये 50 पैसे वाढ मिळाली. यादरम्यान गरीब व कष्टकऱ्यांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व व चळवळी नेतृत्वामुळे कामिनी यांच्या मनामध्ये मास्तरांविषयी आदर व प्रेम निर्माण झाले. त्यांच्यात एक घनिष्ठ नाते निर्माण झाले. पुढे त्याचे प्रेमात रूपांतर झाले. मग पुढे ते 1977 मध्येच विवाहबंधनात अडकले.

राजकीय वातावरणातही प्रेमात खंड नाही
त्यांचे विवाह झाले त्या वेळी मास्तर नगरसेवक होते. पुढे 1978 मध्ये ते प्रथमत: आमदार झाले. तेथून 1995 व 2004 असे तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. मास्तर लोकांच्या प्रश्‍नांसाठी मुंबई, दिल्ली, नागपूर आदी ठिकाणी मोर्चे-आंदोलनांमध्ये व्यस्त होते तर कामिनी या महापालिका आरोग्य विभागात परिचारिका म्हणून रुग्णांची सेवा करत होत्या. त्यांना दोन मुले व एक मुलगी असून, एक मुलगा डॉक्‍टर, दुसरा इंजिनिअर तर मुलगी डॉक्‍टर आहे. 2012 मध्ये कामिनी आडम या परिचारिका सेवेतून निवृत्त झाल्या. मग त्यांनी मास्तरांसह चळवळीत सहभागी झाल्या. 2017 मध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून, राजकीय वातावरणातही त्यांच्या प्रेमात खंड पडला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The love story of former MLA Narasayya Adam and Kamini Adam