स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता फुलले प्रेम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

आपले प्रेम आणि वैवाहिक आयुष्य याबद्दल उमेश पाटील यांनी सांगितले, की मी 1996 ते 2000 दरम्यान दापोली येथे कृषी पदवी व पदविका शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीमध्ये यूपीएससी व एमपीएससी परीक्षा अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला. येथे अभ्यास करत असताना 10 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करून ग्रुपमध्ये चर्चा केल्या जात असत. याच ग्रुपमध्ये तृप्ती विजय कोलते या देखील होत्या.

सोलापूर : प्रेमासाठी दोन जीव समान स्वभावाचे असले तरच ते एकत्र येतात, असे म्हटले जाते. परंतु याला नरखेड (ता. मोहोळ) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील व पुण्याच्या तहसीलदार तृप्ती पाटील यांनी छेद देत भिन्न स्वभाव असूनही प्रमाणिकपणा व विश्‍वासाच्या जोरावर हे जोडपे यशस्वीपणे संसार करत आहे. कुटुंबात मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार झाले पाहिजेत व कुटुंबात लोकशाही नांदत असली पाहिजे, तरच दोन्ही कुटुंबांचे जीवन सुखमय होते, हे या जोडप्याने दाखवून दिले आहे. दरम्यान, पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना उमेश व तृप्ती यांचे प्रेम फुलले व हे दोघे प्रेमाच्या या परीक्षेतही पास झाले आहेत. 

आपले प्रेम आणि वैवाहिक आयुष्य याबद्दल उमेश पाटील यांनी सांगितले, की मी 1996 ते 2000 दरम्यान दापोली येथे कृषी पदवी व पदविका शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीमध्ये यूपीएससी व एमपीएससी परीक्षा अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला. येथे अभ्यास करत असताना 10 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करून ग्रुपमध्ये चर्चा केल्या जात असत. याच ग्रुपमध्ये तृप्ती विजय कोलते या देखील होत्या. आमच्या ग्रुपमध्ये डिस्कशन करत असताना ज्याचे ज्या विषयावर प्रभुत्व आहे, त्यांनी त्याविषयी ग्रुपला मार्गदर्शन करायचे, अशा पद्धतीने हे डिस्कशन चालायचे. यात मी सहकार व अर्थशास्त्र या विषयात मार्गदर्शन करत होतो. हे ग्रुप डिस्कशन करत असताना मुलींची बाजू तृप्ती तर मुलांची बाजू मी मांडायचो. यावेळी एकमेकांच्या विचारांबरोबर एकमेकांच्या नोट्‌सची देवाणघेवाण होत होती. यादरम्यान तृप्ती व माझी ओळख झाली, पुढे मैत्रीही झाली. या ओळखीच्या व अभ्यासाच्या माध्यमातून संवाद वाढत गेला आणि या संवादाचे रूपांतर प्रेमात झाले. 
तद्‌नंतर तृप्ती यांच्या कुटुंबाविषयी चौकशी करायला सुरवात केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्‍वासू सहकारी म्हणून विजय कोलते यांची आजही ओळख आहे. याच विजय कोलते यांची मुलगी म्हणजे तृप्ती कोलते होय. असे असले तरी आपल्या मुलीवरील सुसंस्कार व विश्‍वास यामुळे कोलते कुटुंबीयांनी उमेश व तृप्तीच्या लग्नाला परवानगी दिली. दरम्यान, तृप्ती यांची एमपीएससीमधून पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. यासाठी त्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले होते. त्याच वेळी नायब तहसीलदार पदासाठीही त्यांची निवड झाली. तृप्ती या पदावर रुजू झाल्या. 
अभ्यासाची देवाणघेवाण करता करता उमेश यांनी एकेदिवशी अचूक अंदाज घेत तृप्ती यांना एकत्र येण्यासाठी प्रपोज केले. मात्र, या प्रकारामुळे तृप्ती यांची अक्षरश: घाबरगुंडी उडाली आणि थरथरत त्या निघून गेल्या. मात्र, याचा परिणाम काय होईल या चिंतेने उमेश यांना ग्रासले होते. परंतु झाले उलटेच आणि अखेर तृप्ती यांचा होकार मिळाला. यामुळे उमेश यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यानंतर दोघांनीही एकमेकांच्या कुटुंबातील नातेवाइकांना विचारणा केली. यानंतर मुलीच्या कुटुंबाकडून मुलाच्या कुटुंबाची व मुलाच्या कुटुंबाकडून मुलीच्या कुटुंबाची चौकशी व चर्चा झाली. अखेर लग्नही ठरले आणि 2006ला उमेश व तृप्ती यांचे लग्न पुण्यात धूमधडाक्‍यात झाले. 
आपल्या क्षेत्रात दोघांची यशस्वी वाटचाल 
सध्या तृप्ती पाटील या पुणे येथे तहसीलदार म्हणून शासकीय सेवेत आहेत व उमेश पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते म्हणून राजकीय क्षेत्रात यशस्वीरीत्या वाटचाल करत आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. एकमेकांच्या कामात ढवळाढवळ न करणे, हे दांपत्य कटाक्षाने पाळते. या दोघांच्या माध्यमातून पाटील व कोलते परिवाराची आज अतूट नाळ जुळली आहे, हे मात्र नक्की.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love story of Umesh Patil and Trupti