'येथील' द्राक्ष पट्ट्यात दोडका अन्‌ कारले तेजीत ! अवघ्या 30 गुंठ्यात लाखाचे उत्पन्न 

प्रशांत काळे 
Friday, 18 September 2020

हिंगणी (ता. बार्शी) येथील सचिन भगवान गव्हाणे या शेतकऱ्याने मागील 20 वर्षांपासून द्राक्षबाग सांभाळली होती. उन्हाळ्यात विहिरीला पाणी कमी व्हायचे तसेच निसर्गाशी सामना करावा लागत असे. या संकटांना कंटाळून द्राक्ष बाग मोडून दोडका अन्‌ कारल्याचे पीक घेण्यास मागील तीन वर्षांपासून सुरू केले. 

बार्शी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍याला वरदान ठरलेल्या हिंगणी प्रकल्पामुळे 500 एकरपेक्षा जास्त द्राक्ष पीक घेतले जात आहे. तरी, अल्प भूधारक शेतकरी सचिन व संतोष गव्हाणे या बंधूंनी मागील तीन वर्षांपासून विहिरीचे पाणी कमी पडत असल्याने द्राक्षाची बाग मोडून दोडके अन्‌ कारले पीक घेण्याचा निर्णय घेतला असून, अवघ्या 30 गुंठ्यात कारले व दोडक्‍याचे प्रत्येकी लाखाचे उत्पन्न घेतले जात आहे. 

हेही वाचा : विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पंढरपूरवासीयांनी अनुभवले निसर्गाचे रौद्ररूप ! 

हिंगणी (ता. बार्शी) येथील सचिन भगवान गव्हाणे या शेतकऱ्याने मागील 20 वर्षांपासून द्राक्षबाग सांभाळली होती. उन्हाळ्यात विहिरीला पाणी कमी व्हायचे तसेच निसर्गाशी सामना करावा लागत असे. या संकटांना कंटाळून द्राक्ष बाग मोडून दोडका अन्‌ कारल्याचे पीक घेण्यास मागील तीन वर्षांपासून सुरू केले. 

जून ते सप्टेंबर असा या पिकाचा हंगाम असून वर्षात एवढेच पीक घेतले जात आहे. द्राक्ष बागेचा तयार असलेला अँगल तारांचा मंडपच दोडका आणि कारल्याच्या वेलासाठी वापरला जात आहे. दिवसातून दोन तास पाणी दिले तरी पुरते व पाणी ड्रिपद्वारे दिले जात असल्याने पाणी पुरते. 

दोडका व कारल्यासाठी बार्शी, लातूर येथील बाजारपेठ उपलब्ध असून सरासरी 40 ते 45 रुपये किलो भाव मिळत आहे. एक दिवसाआड दोन्ही पिकांचे 15 ते 20 कॅरेट निघतात. एका कॅरेटचे 10 ते 15 किलो पिकाचे वजन होते. द्राक्षापेक्षा पाणीही कमी लागत आहे. 

याबाबत शेतकरी सचिन गव्हाणे म्हणाले, सुरवातीला लागणपासून चार हजार रुपये खर्च येतो. दोडका अन्‌ कारले एकत्र पीक घेतल्यामुळे फायदा होत आहे. पत्नी राणी गव्हाणे, बारावीचे शिक्षण घेत असलेला अजय, दहावीमधील विश्वजित असे आम्ही कुटुंबातील व्यक्तीच राबत असतो. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The low water consuming crop is now being grown in the grape belt at Hingani