महागावच्या सुपुत्राने पाच मुलांचे स्वीकारले पालकत्व 

शांतिलाल काशीद
Thursday, 4 June 2020

कोडरमा जिल्ह्यातील तृतीयपंथी बांधवांच्या दारात जाऊन गॅसचे वितरण केले. परिस्थितीमुळे भांडी धुण्याचं काम करणाऱ्या महिलेला तत्काळ पेन्शन सुरू केली. 

मळेगाव (सोलापूर) : काळाचा घाला एका कुटुंबावर पडल्यानंतर महागावचे सुपुत्र तथा कोडरमाचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी अनाथ झालेल्या पाच मुलांचे पालकत्व स्वीकारत त्यांना नव्या जीवनाची प्रेरणा दिली आहे. 

घोलप यांची कारकीर्द अत्यंत वेगळी 
महाराष्ट्राचे सुपुत्र तथा बार्शी तालुक्‍यातील महागावचे सुपुत्र असलेले कोडरमाचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांची कारकीर्द अत्यंत वेगळी आहे. एक उत्तम प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, कवी, लेखक, चित्रकार, वृक्षमित्र, कुटुंबप्रमुख आदी भूमिका साकारत झारखंडमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईच्या काळात दाखवलेली माणुसकी इतरांना उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. 

हेही वाचा : सर्व्हर डाऊनने अक्कलकोट तालुक्‍यातील निगेटिव्ह महिला झाली कोरोना पॉझिटिव्ह

"उमेद' निर्माण केली 
कोडरमा शहरात छोटगी बागी वॉर्ड नं. 1 परिसरात राहणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. पाच वर्षांपूर्वी बाबा गेले व आता आईचे छत्र हरवले अशी पाच भावंडं आई मालतीच्या अचानक जाण्याने आणखीन दुःखाच्या खाईत लोटली गेली. ही दुःखद घटना समजताच जिल्हाधिकारी घोलप यांनी पाच अनाथ मुलाचं पालकत्व स्वीकारत त्यांच्यामध्ये जगण्याची "उमेद' निर्माण केली. 

भावाची मिळाली साथ 
"मैं भी इस हालात से गुजरा हूँ', आपण जे भोगले, सोसले ते वेदनांचे चटके इतरांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून अहोरात्र सेवा करणारे घोलप अनेकांच्या जगण्याचं समीकरण झाले आहेत. छोट्याशा खेड्यात, सामान्य कुटुंबात जन्मलेल्या घोलप यांना मातोश्री आक्का व भाऊ उमेश घोलप यांची मिळालेली साथ व आशीर्वाद उत्तम कार्यासाठी दिशादर्शक व मार्गदर्शक ठरले. 

हेही वाचा : महूदमध्ये नागरिकांनी अशी घेतली काळजी 

कोरोना संसर्ग रोकण्यासाठी उपाय 
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोडरमा जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम, सर्वेलन्स टीम, पोलिस टीम, सॅनिटरायझेशन टीम, स्वच्छतेचे देवदूत निर्माण करून कोरोनाविरुद्धची लढाई आपण नक्की जिंकू, असा विश्‍वास त्यांनी निर्माण केला आहे. 
घोलप यांनी "नाही थांबला तो संपला' या कवितेतून देशातील जनतेला केलेले आवाहन प्रेरणादायी आहे. तसेच दोन पाऊल पुढे येत स्वतःचा व कर्मचाऱ्यांचा सात दिवसांचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जमा करून इतरांसाठी प्रेरणा निर्माण केली. 

उमेद प्रतिष्ठानकडून जीवनावश्‍यक किटचे वाटप 
झारखंडमध्ये कार्यरत असलेले घोलप जिल्ह्यातील जनतेला विसरले नाहीत. लॉकडाउन काळात त्यांनी गरजूंना उमेद प्रतिष्ठानच्या माध्यमातून जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप केले. ते कुटुंबाची देखील जबाबदारी उत्तमप्रकारे सांभाळत आहेत. स्वतः मुलाचे केस कापून जनतेला सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करा हा संदेश दिला. चित्रकलेच्या माध्यमातून केलेली जाणीवजागृती, माणसाबरोबरच पशुपक्ष्यांची काळजी घेत तळपणारा सूर्य पाहत पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली. कोडरमा जिल्ह्यातील तृतीयपंथी बांधवांच्या दारात जाऊन गॅसचे वितरण केले. परिस्थितीमुळे भांडी धुण्याचं काम करणाऱ्या महिलेला तत्काळ पेन्शन सुरू केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahagaon's son accepted custody of five children