महेश कोठे, तौफिक शेख यांनी घेतली शरद पवारांची भेट

प्रमोद बोडके
Tuesday, 6 October 2020

आगामी महापालिका निवडणूकीच्या तोंडावर सोलापुरातील स्वयंभू व जनाधार असलेल्या नेत्यांना सोबत घेण्याची रणनिती राष्ट्रवादी कॉंग्रेसने आखली आहे. महेश कोठे व तौफिक शेख यांच्या आजच्या शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीबद्दल कमालीची गोपनियता पाळण्यात आली आहे. 

सोलापूर : सोलापूर शहराच्या राजकारणात जोरदार राजकीय भूकंप घडविण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरु केली आहे. एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी आज राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत पक्ष कार्यालयात भेट घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. 

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तौफिक शेख हे खून प्रकरणात तुरुंगात गेले. ते बाहेर येईपर्यंत सोलापूर शहरातील एमआयएमची धुरा फारुख शाब्दी यांच्या हातात गेली आहे. राजकीय घुसमट आणि सत्तेचा आधार शोधण्यासाठी तौफिक शेख यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्यासोबत एमआयएमचे सहा नगरसेवक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शेख यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिल्याचे समजते. सोलापुरात जाहीर कार्यक्रम घेऊन हा प्रवेश होण्याची शक्‍यता आहे. 

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेस या महाविकास आघाडीचा मोठा अडसर महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर येत असल्याचे समजते. कोठे यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत घेतल्यास त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोठेंच्या बाबतीत आपण स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करु त्यानंतर तुम्हाला कळवू, अशी भूमिका शरद पवार यांनी कोठे यांना सांगिल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Kothe, Taufiq Sheikh met Sharad Pawar