"या' ग्रामस्थांनी फिरवली तपासणीकडे पाठ, पुन्हा घातला अनेक ठिकाणी गर्दीचा घाट 

Mahud
Mahud

महूद (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील महूद येथील कोरोनाबाधित रुग्णसंख्या शतकावर येऊन ठेपली असताना, येथील नागरिकांनी तपासणीकडे चक्क पाठ फिरवली आहे. तर दुसरीकडे याचे कोणतेही गांभीर्य नसणारे नागरिक पुन्हा एकदा खताचे दुकान, बॅंका, रेशन दुकान यांसमोर तुफान गर्दी करून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. 

तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ येथील सर्व व्यवहार ठप्प होते. तरीही वरचेवर रुग्णसंख्या वाढतच होती. रुग्णांचा शोध घेण्यासाठी येथे रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या वाढवण्यात आली. सलग पंधरा दिवस मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट घेतल्यानंतर येथील रुग्णसंख्या 75 वर जाऊन पोचली. यापैकी काही रुग्ण बरे होऊन घरी परतले असले तरी काहीजण अत्यवस्थ आहेत. दोघा ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोणतीही लक्षणे नसताना या तपासण्या ठराविक भागातच केल्या जात असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांमधून होत होता. त्यावरून ग्रामस्थ व ग्राम कृती समितीमध्ये अनेक वेळा वाद निर्माण झाले आहेत. दरम्यान, चिकमहूद व इतर परिसरात रुग्ण सापडल्याने रॅपिड तपासणी त्या भागात चालू झाली. आपोआपच येथील तपासण्या बंद झाल्या. 

परिसरातील इतर गावांमधील तपासणीचा ताण कमी झाल्यानंतर आरोग्य विभागाने पुन्हा महूद येथे रॅपिड टेस्ट सुरू केली. त्याबाबत नागरिकांना आवाहनही करण्यात आले. मात्र महूद येथील नागरिकांनी या तपासणीकडे चक्क पाठ फिरविली आहे. दोन दिवस सलग आवाहन करूनही नागरिक तपासणीकरिता येत नाहीत, असे ग्राम कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. रुग्णसंख्या शतकाच्या उंबरठ्यावर आली असतानाही येथील नागरिक व व्यावसायिक कोणतेही नियम पाळताना दिसून येत नाहीत. शेतकरी खतासाठी व इतर शेती साहित्यासाठी दुकानांसमोर भल्या मोठ्या रांगा करत आहेत. येथील बॅंकांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. रेशन दुकानासमोर ग्राहक गर्दी करत आहेत. शारीरिक अंतर पाळणे, मास्कचा वापर, स्वच्छता यांसारख्या अतिशय आवश्‍यक गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ही गर्दी अशीच होत राहिली तर पुन्हा रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी दुकानदार, व्यावसायिक यांनी काटेकोर नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. 

सलग तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ पूर्णपणे बंद असणारे महूद येथील व्यवहार सुरू करण्यास नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार येथील जुनी बाजारपेठ व आतार गल्ली हा भाग पूर्णपणे बंद राहील. हा भाग वगळता इतर भागातील शेती, व्यावसायिक, किराणा दुकानदार व इतर अत्यावश्‍यक सेवेची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांसाठी सकाळी नऊ ते दुपारी एक ही वेळ निर्धारित करण्यात आली आहे. या वेळी संबंधित दुकानदाराने नियमांचे पालन करावे, अशी सूचना ग्राम कृती समितीने केली आहे. 

महूदचे मंडलाधिकारी दिनेश भडंगे म्हणाले, आवाहन करूनही नागरिक तपासणीकरिता येत नाहीत. मात्र ज्यांना त्रास होईल किंवा लक्षणे दिसतील अशा नागरिकांनी ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतःची तपासणी करून घ्यावी. तशी सोय करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com