मंगळवेढ्यात केंद्र सरकारच्या विरोधात सर्वपक्षीयांनी फुंकली रस्त्यावरच चूल ! 

हुकूम मुलाणी 
Saturday, 6 February 2021

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ व दिल्ली येथे शेतकरी आंदोलनातील शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ याशिवाय इंधन दरवाढीच्या विरोधात मंगळवेढ्यात सर्वपक्षीयांच्या वतीने रस्त्यावर चूल मांडून रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. 

मंगळवेढा (सोलापूर) : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ व दिल्ली येथे शेतकरी आंदोलनातील शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ याशिवाय इंधन दरवाढीच्या विरोधात मंगळवेढ्यात सर्वपक्षीयांच्या वतीने रस्त्यावर चूल मांडून रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली. 

या आंदोलनात शहर व तालुका येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, कॉंग्रेस पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, अन्य विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी बोलताना पश्‍चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे ऍड. राहुल घुले म्हणाले की, तीनही कृषी कायद्यांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक दोघेही भरडले जाणार असून, देशातील ठराविक वर्गाने शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अंबानी व अदानी या दोन उद्योगपतींच्या दावणीला संपूर्ण देश बांधण्याचे काम मोदी आणि भाजप करत आहे. केंद्र सरकारचे कृषी कायदे देशाला गुलामगिरीमध्ये ढकलतील, अशी भीती घुले यांनी व्यक्त केली. 

संभाजी ब्रिगेडचे समाधान क्षीरसागर म्हणाले की, केंद्र सरकार हे शेतकरी व सामान्य माणसांच्या विरोधी नवनवीन कायदे अमलात आणून उद्योगपतींचे हित जोपासत आहे. अशा सरकारचा संभाजी ब्रिगेड मंगळवेढाच्या वतीने निषेध व्यक्त केला. 

नगराध्यक्षा अरुणा माळी म्हणाल्या, की 72 दिवस शेतकऱ्यांनी आंदोलन करून देखील सरकारला त्याची जाणीव होत नाही. शेतकरी हे अन्नदाते आहेत. त्यांच्या हिताचा विचार करावा व इंधन दरवाढ रोखावी. 

या वेळी तालुकाध्यक्ष भारत बेदरे, सिद्धेश्वर हेंबाडे, मनोज माळी यांचीही भाषणे झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागचे विजय खवतोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, ऍड. नंदकुमार पवार, मारुती वाकडे, मुजम्मील काझी, राजाराम सूर्यवंशी, अजित जगताप, प्रवीण खवतोडे, दिलीप जाधव, श्रीमंत केदार, बिराजदार, आबा खांडेकर, हर्षद डोरले, पी. बी. पाटील, संगीता कट्टे, प्रफुल्लता स्वामी, मुरलीधर घुले, सोमनाथ माळी, प्रवीण हजारे, दादा टाकणे, संदीप घुले, पंडित गवळी, नाथा ऐवळे, अमोल बचुटे, मंदा सावंजी, सारिका सलगर, रेखा साळुंखे, स्मिता अवघडे, सुनीता मेटकरी, महानंदा धुमाळे, विनायक दत्तू, अजित गायकवाड, स्वप्नील भगरे व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At Mangalvedha there was an agitation on behalf of all parties against the Central Government