मनोहरभाऊ डोंगरे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर नेमले प्रशासक 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न 
इतर पतसंस्थेत जे चालते तेच आम्ही केले होते. पण, कुटुंब कल्याण योजनेबाबत काही सभासदांनी तक्रार केली होती. आम्ही सर्व संचालकांनी राजीनामे दिले आहेत. येत्या मार्चला मुदत संपत आहे. त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत सभासदच सर्व काही ठरवतील. आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. 
राजाभाऊ राऊत, जिल्हाध्यक्ष, आदर्श शिक्षक समिती. 

सोलापूर ः मोहोळ येथे कार्यरत असलेल्या मनोहरभाऊ डोंगरे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधकांनी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार व शिक्षक वर्तुळात खळबळ उडाली आहे. आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही पतसंस्था जिल्ह्यात कार्यरत आहे. 

पतसंस्थेचे सभासद धर्मराज चवरे, राजेंद्र वाघमारे व अन्य 14 सभासदांनी कुटुंब कल्याण योजनेतील अनियमितता, खर्चाची उधळपट्टी, जागा खरेदीतील गैरव्यवहार, कर्ज वाटपातील मनमानी अशा सात मुद्द्यांच्या आधारे सहकारमंत्र्यांकडे फेब्रुवारीत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने चौकशी समितीमार्फत शहानिशा करुन तक्रारी अर्जातील मुद्यांच्याआधारे संचालक मंडळावर आरोप निश्‍चित करून संचालक मंडळ बरखास्त का करू नये? अशी विचारणा नोटीसद्वारे केली होती. त्याचबरोबर संस्थेच्या एकंदर कामकाजाच्या चौकशीसाठी भरारी पथकाची नियुक्ती केली होती. 

या पार्श्‍वभूमीवर संस्थेच्या संचालक मंडळाने चौकशी समितीला सामोरे जाण्याऐवजी 24 ऑगष्टला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आपल्या पदांचे राजीनामे सादर करुन ऍड. विनायक नागणे यांच्यामार्फत लेखी म्हणणे सादर केले होते. संचालक मंडळाच्या राजीनाम्यामुळे संस्थेचे कामकाज ठप्प होऊ नये तसेच सभासद व संस्थेच्या हिताच्या दृष्टीने सहकार कायद्यातील कलम 77 अन्वये कामकाज सांभाळण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयीन कक्ष अधिकारी डी. एस. भंवर यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी प्रशासक म्हणून केली आहे. 2005 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेवर सभासदांनी मोठा विश्‍वास टाकून संस्थेचे हित जोपासले. संचालक मंडळाच्या अविरोध निवडी करुन संचालक मंडळावर नेहमीच विश्‍वास टाकला. जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक संस्था कार्यरत असून अशा पद्धतीची कारवाई होणारी ही पहिलीच संस्था ठरली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manoharbhau Dongre Primary Teacher Credit Union Administrator Appointed