सत्तांतरासाठी कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला ! विकासाच्या मुद्याऐवजी राजकीय धुळवडीचेच अधिक दर्शन

अभय जोशी 
Sunday, 17 January 2021

अनेक गावात आरोप-प्रत्यारोप केल्याने विकासाच्या मुद्याऐवजी गावकऱ्यांना राजकीय धुलवड पहावी लागली. बहुतांश ठिकाणी अटीतटीने मतदान झाल्याने मतमोजणीवेळी काट्याची टक्कर दिसून येणार आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील अनेक गावात ग्रामपंचायत निवडणुकीत एका बाजूने सत्ता टिकवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूने सत्तांतर घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यानी जीवाचे रान केले. आता विजयासाठी त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अनेक गावात आरोप-प्रत्यारोप केल्याने विकासाच्या मुद्याऐवजी गावकऱ्यांना राजकीय धुलवड पहावी लागली. बहुतांश ठिकाणी अटीतटीने मतदान झाल्याने मतमोजणीवेळी काट्याची टक्कर दिसून येणार आहे. 

सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

करकंब ग्रामपंचायतीची निवडणूक यंदाही मारुती देशमुख आणि नरसाप्पा देशमुख या दोन सख्ख्या भावांच्या गटात झाली. दोन्ही बाजूने निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार, हे सांगता येणे अवघड आहे. कासेगावात मतभेद विसरुन पांडुरंग कारखान्याचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक विजयसिंह देशमुख, पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख यांच्यासह तिसऱ्या आघाडीतील लोक एकत्र आले होते. त्यांच्या विरोधात माजी सरपंच दाजीसाहेब देशमुख व अन्य काही मंडळींनी पॅनेल उभे केल्याने रंगत वाढली होती. मतभेद विसरून एकत्र आलेल्या पॅनलच्या हाती ग्रामपंचायतीची सूत्रे जातील, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. 

हे ही वाचा : मंगळवेढ्यातील सत्तासंघर्षात निवडणुकीला गालबोट ! पराभवाची संक्रांत कोणावर व विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?

रोपळे येथेही कदम गटाची सत्ता कायम राहण्याची चिन्हे आहेत. भोसेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश राजूबापू पाटील यांच्या गटाचा विजय निश्‍चित मानला जात आहे. खर्डीत आमदार परिचारक गटाचा पूर्वीप्रमाणेच झेंडा कायम राहण्याची चिन्हे आहेत, तर भंडीशेगावमध्ये सत्तांतर होण्याची दाट शक्‍यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांमुळे मतदार आमच्या पाठीशी उभा राहिला. याउलट ग्रामपंचतीच्या कामात झालेला भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाची कामे यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. परिणामी यावेळी परिवर्तन होईल. आमच्या आघाडीचे सतरापैकी पंधरा उमेदवार निवडून येतील. 
- बाळासाहेब देशमुख, करकंब 

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि सामान्य जनतेशी जुळलेली नाळ यामुळे आम्हाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. निवडणूक सामान्य लोकांनीच हातात घेतली होती. त्यामुळे नेते विरुद्ध जनता असे स्वरूप आलेल्या या निवडणुकीत आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दोन-तीन जागा वगळता इतर सर्व जागांवर आमचा विजय निश्‍चित आहे. 
- नरसाप्पा देशमुख, करकंब 

रोपळे येथे मुलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला. रस्ते, वीज, पाणी, स्वच्छतेवर काम केले. जलसंधारणाचे काम केले. ग्रामविकासाच्या मुद्यांवर ही निवडणूक लढवली आहे. आमचे सर्वच्या सर्व उमेदवार निश्‍चित विजय होतील. 
- दिनकर कदम, रोपळे बुद्रुक 

रोपळे गावचा सर्वांगीण विकास करण्याच्या मुद्यावरच निवडणूक लढवली. आमच्या आवाहनाला लोकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील शिकलेल्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली गावाला नवी दिशा दिली जातेय. याच मुद्यावर आमचे पॅनल निवडून येणार आहे. 
- कदम रोपळे, बुद्रुक
 
पाझर तलावात बारमाही पाण्याची सोय केली. जिल्हा परिषद शाळा येथे जिल्ह्यातील सर्वात मोठे सभा मंडप बांधला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आमच्या पॅनलचा विजय निश्‍चित आहे. 
- राजाभाऊ माने, माजी सरपंच, भंडीशेगाव 

सत्ताधाऱ्यांनी लोकांना शासकीय योजनेपासून दूर ठेवले. पिण्याच्या पाण्याची कायम गैरसोय होते. संपूर्ण गावचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. पालखी मार्गावर गाव असून, देखील काहीच विकास झाला नाही. याचा मतदारांनी नक्कीच विचार केला आहे. 
- शिवाजीराव कोळवले, माजी उपसभापती, भंडीशेगाव
 
यशवंतभाऊ पाटील व राजूबापू पाटील यांच्या आदर्श विचाराला समाजमान्यता असून, त्यांच्या प्रेरणेतून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामाला मतदार निश्‍चित पसंती देणार आहेत. 11 सदस्य बिनविरोध झाले. उरलेल्या सहा जागांसाठी निवडणूक झाली. ते सहाही उमेदवार नक्कीच निवडून येतील. 
- ऍड. गणेश राजूबापू पाटील, भोसे 

महादेव खटके यांच्या धोरणानुसार त्यांच्या पश्‍चात गट, तटाचा विचार न करता फक्त समाजकारण करण्याचा आपला प्रयत्न आहे. प्रचाराच्या वेळी चांगला पाठिंबा दिसून आला. त्यामुळे विजय निश्‍चित आहे. 
- खटके, भोसे 

निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला. एक जागा आमची बिनविरोध झाली. परंतु सोळा जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली. गावातील प्रमुख सर्व मंडळी एकत्र आल्याने चांगले वातावरण निर्माण झाले. आमचे उर्वरित सोळा उमेदवारदेखील निश्‍चित विजयी होतील. 
- वसंतराव देशमुख, कासेगाव 

सर्व लोकांना विचारात न घेता प्रस्थापित नेतेमंडळी एकत्र बसली. त्यांनी परस्पर आपसात जागा वाटप करून टाकले आणि नंतर निवडणूक बिनविरोध करु असे आवाहन केले. गावातील अनेकांना संबंधितांची भूमिका पटली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवली. आमचा विजय निश्‍चित आहे. 
- दाजी देशमुख, कासेगाव
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In many villages of pandharpur taluka activist have done a lot of work in Gram Panchayat elections