मराठा क्रांती मोर्चा आंदोलन : पंढरपुरात झाले सरकारविरोधी फलकाचे दहन

भारत नागणे 
Friday, 11 September 2020

सर्वोच्च न्यायालयात आरक्षण प्रश्नी सरकार बाजू मांडण्यास कमी पडल्याचा आरोप करत आज मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा राज्य आणि केंद्र सरकार विरोधात एल्गार पुरकारला आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकार विरोधात निदर्शने करत आक्षरण मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. 

पंढरपूर (सोलापूर) : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर आता मराठा समाजातील विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेत राज्य आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज पंढरपूर येथे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधी फलकाचे दहन करून आंदोलन करण्यात आले. 

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती देत हे प्रकरण खंडपीठाकडे वर्ग केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आरक्षण प्रश्नी मराठा समाजाच्या विविध संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. 

सर्वोच्च न्यायालयात आरक्षण प्रश्नी सरकार बाजू मांडण्यास कमी पडल्याचा आरोप करत आज मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा राज्य आणि केंद्र सरकार विरोधात एल्गार पुरकारला आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकार विरोधात निदर्शने करत आक्षरण मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. येत्या 20 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारने आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, यासाठी सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी नामांकित कायदे तज्ज्ञांची फौज उभी करावी; अन्यथा सरकार विरोधात राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. 

या आंदोलनामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आकाश पवार, संदीप मुटकुळे, शहाजी शिंदे, गणेश चव्हाण, नीलेश गंगथडे, बापू चौधरी आदींसह मराठा समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha agitation in Pandharpur by burning anti government placards