मराठा क्रांती मोर्चाने केले तिरडी आंदोलन (Video)

अरविंद मोटे
Sunday, 13 September 2020

राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमा असलेली तिरडी शिवाजी चौकातून मिरवण्यात आली. शनिवारी झालेल्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाने यापुढे गनिमीकावा पद्धतीने आंदोलन सूरू ठेवण्यात येईल, असे ठरवले होते. त्याप्रमाणे आज सकाळी पावणे अकरा वाजता सुमारे 35 ते 40 कार्यकर्ते शिवाजी चौकात जमले व त्यांनी राज्य सरकारचा निषेध करत तिरडी आंदोलन केले. 

सोलापूर : येथील शिवाजी चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले. रविवारी (ता. 13) सकाळी पावणे अकरा वाजता मराठा समाजातील 35 ते 40 तरुण रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनातून शिवाजी चौकात जमले. 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुप्रिम कोर्ट, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची तिरडी काढण्यात आली. सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारची तिरडी काढण्यात आली. या वेळी तिरडी तयार करून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांचे फोटो लावून तिरडी काढण्यात आली.

 

या वेळी केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा "राम नाम सत्य है', "एक मराठा लाख मराठा', "आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या...' अशा घोषणा देण्यात आल्या. भगव्या टोप्या, भगवी उपरणे घालून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार, अजिंक्‍य पाटील, ओम घाडगे, अर्जुन सोनवणे, राज पवार, राहुल दहीहंडे, कुणाल मोरे, श्रीकांत जाधव, अक्षय पांडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha staged a Bier agitation