"बा विठ्ठला, सरकारला सुबुद्धी दे !' साकडे घालून मराठा ठोक मोर्चा पंढरीतून मंत्रालयाकडे मार्गस्थ 

राजकुमार घाडगे 
Saturday, 7 November 2020

"बा विठ्ठला, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठाकरे सरकारला सुबुद्धी दे', असे साकडे घालत शनिवारी (ता. 7) मराठा क्रांती ठोक मोर्चा पंढरपूरमधील नामदेव पायरीचे दर्शन घेऊन मार्गस्थ झाला. 

पंढरपूर (सोलापूर) : "बा विठ्ठला, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठाकरे सरकारला सुबुद्धी दे', असे साकडे घालत शनिवारी (ता. 7) मराठा क्रांती ठोक मोर्चा पंढरपूरमधील नामदेव पायरीचे दर्शन घेऊन मार्गस्थ झाला. 

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पंढरपूर ते मंत्रालय (मुंबई) पायी दिंडी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चौफाळा या परिसरामध्ये संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. शनिवारी सकाळपासूनच पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आले होते. मात्र, संचारबंदीचा आदेश झुगारून मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्ते शिवाजी चौकात एकत्र आले होते. नामदेव पायरीचे दर्शन घेऊनच आम्ही मोर्चाला सुरवात करू, या मागणीसाठी त्यांनी शिवाजी चौकात ठिय्या मांडला होता. तद्‌नंतर प्रशासनाने ठराविक कार्यकर्त्यांना परवानगी दिल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव पायरीचे दर्शन घेत शहरातून प्रस्थान केले. 

मोर्चामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे, महेश लांडगे, धनंजय साखळकर, किरण घाडगे, अर्जुन चव्हाण, संदीप मांडवे, रामभाऊ गायकवाड, नितीन शेळके, दीपक वाडदेकर आदींसह मराठा समाजाचे कार्यकर्ते सामील झाले होते. मात्र नवीन बस स्थानकासमोर आल्यानंतर पोलिस प्रशासनाने मोर्चा रोखला व मोर्चातील प्रमुख दहा कार्यकर्त्यांना खासगी वाहनाने पुण्याकडे रवाना केले. पुण्यामध्ये राज्य सचिवांबरोबर क्रांती मोर्चातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे, असे समजते. 

मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Thok Morcha marched from Pandharpur to Mantralaya