"नवरी मिळे नवऱ्याला'! नवरी काही मिळाली नाही पण या सतरा इच्छुक नवऱ्यांबरोबर जे काही घडलं ते पाहून... 

भारत नागणे 
Tuesday, 29 December 2020

मुंबई येथील "नवरी मिळे नवऱ्याला' या विवाह जुळवून देणाऱ्या विवाह संस्थेतील राज पाटील आणि सचिन बनसोडे यांची सुस्ते (ता. पंढरपूर) येथील शहाजी शिंदे याची समाज माध्यमातून ओळख झाली. ओळखीतून राजन पाटील यांनी शिवाजी शिंदे यांना पैशाचे आणि नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विवाह इच्छुक तरुणांकडून पैसे घेऊन नोंदणी करण्यास सांगितले. त्यानुसार... 

पंढरपूर (सोलापूर) : सध्या विवाह जुळवून आणणाऱ्या अनेक वधू-वर सचूक मंडळांचा आणि संस्थांचा सुळसुळाट सुरू आहे. काही संस्थांच्या माध्यमातून अनेकांचे विवाह जुळवले जात असले तरी काही संस्थांमुळे फसवणूक होत असल्याचे प्रकार देखील वाढू लागले आहेत. अशाच मुंबईतील "नवरी मिळे नवऱ्याला' या विवाह संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर परिसरातील अनेक तरुणांना बोहल्यावर चढण्याआधीच स्वप्नातील नवरीने लाखो रुपयांचा गंडा घालून आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी सुस्ते (ता. पंढरपूर) येथील शहाजी शिवाजी शिंदे यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

मुंबई येथील "नवरी मिळे नवऱ्याला' या विवाह जुळवून देणाऱ्या विवाह संस्थेतील राज पाटील आणि सचिन बनसोडे यांची सुस्ते (ता. पंढरपूर) येथील शहाजी शिंदे याची समाज माध्यमातून ओळख झाली. ओळखीतून राजन पाटील यांनी शिवाजी शिंदे यांना पैशाचे आणि नोकरी लावण्याचे आमिष दाखवून विवाह इच्छुक तरुणांकडून पैसे घेऊन नोंदणी करण्यास सांगितले. त्यानुसार शहाजी शिंदे यांनी गावातीलच विवाह इच्छुक असलेल्या श्‍याम शिंदे यांना माहिती देऊन त्यांचेही या विवाह संस्थेत विवाहासाठी नाव नोंदणी केली. 

त्यानंतर लग्नासाठी तयार असलेल्या मुलींचे फोटो आणि मोबाईल नंबर दिले. मोबाईलवरून श्‍याम शिंदे यांनी त्या मुलीशी बोलणे सुरू केले. दरम्यान, नवरी मुलींकडून लग्नासाठी लागणारे कपडे, सोने, कपाट आदी साहित्य खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यानुसार श्‍याम शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्या इतर विवाहासाठी नोंदणी केलेल्या चार मित्रांचे मिळून दोन लाख रुपये राजन पाटील यांच्या नावे ऑनलाइन ट्रान्स्फर केले. पैसे मिळाल्यानंतर विवाह नोंदणी संस्थेकडून नोव्हेंबर महिन्यात विवाहाची तारीखही देण्यात आली. विवाहाची तारीख उलटून गेल्यानंतर संबंधित विवाह संस्थेकडे व राजन पाटील यांच्याकडे श्री. शिंदे व त्यांच्या इतर मित्रांनी फोनवरून संबंधित विवाह संस्थेशी व राजन पाटील या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतरही संबंधित संस्थेकडे वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही अद्याप संपर्क झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहाजी शिंदे व श्‍याम शिंदे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. 

या विवाह संस्थेकडून पंढरपूरसह परिसरातील 17 तरुणांची सुमारे सहा लाख 66 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब देखील त्यांच्या या तक्ररीनंतर समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. विवाह इच्छुक तरुणांनी कोणत्याही आमिषेला बळी पडू नये किंवा समाजमाध्यमातून व फोन आला म्हणून पैसे देऊ नयेत, असे आवाहन पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी केले आहे. 

मुंबई येथील "नवरी मिळे नवऱ्याला' या विवाह संस्थेत विवाहासाठी मी नोंदणी केली होती. नोंदणी केल्यानंतर माझ्यासह इतर मित्रांचे दोन लाख रुपये माझ्या बॅंक खात्यातून ऑनलाइन ट्रान्स्फर केले आहेत. पैसे दिल्यानंतर प्रत्यक्ष लग्नाची नोव्हेंबर महिन्यात तारीख दिली होती. दिलेली तारीख उलटून गेल्यानंतर संबंधित संस्थेकडे व ज्यांच्या नावे पैसे ट्रान्स्फर केले ते राजन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होत नाही. शेवटी माझी व इतर 17 विवाह इच्छुक तरुणांची सुमारे सहा लाख 66 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 
- श्‍याम शिंदे, 
विवाह इच्छुक तरुण, सुस्ते 

नवरी मिळे नवऱ्याला या विवाह संस्थेत विवाहासाठी नाव नोंदणी केलेल्या सुस्ते व परिसरातील काही विवाह इच्छुक तरुणांची आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार तपास सुरू केला आहे. 
- किरण अवचर, 
पोलिस निरीक्षक, पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Marriage Bureau in Mumbai cheated the youth of Pandharpur