तीन कृषी काळे कायदे म्हणजे फाशी का फंदा ! आडम मास्तरांचे मोदी सरकारवर टीकास्त्र 

Adam
Adam

सोलापूर : शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणून संबोधणाऱ्या रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या राज्यात सर्वांत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. तीन कृषी काळे कायदे म्हणजे फाशी का फंदा आहे. आमची काळी आई धनदांडगे, भांडवलदारांच्या घशात घालून मोदी सरकार शेतकऱ्यांना वेठबिगारीस लावणार का, असा संतप्त सवाल ज्येष्ठ नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी सरकारला केला. 

शेतकरी विरोधी, कामगार विरोधी धोरण राबविणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात देशातील शेतकऱ्यांनी अभूतपूर्व आंदोलन पुकारले आहे. त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने सोमवारी (ता. 28) सायंकाळी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे माजी आमदार आडम यांच्या अध्यक्षतेखाली व सिटूचे राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार मेळावा पार पडला. 

अध्यक्षीय भाषणात श्री. आडम म्हणाले, देशासाठी जिवाची पर्वा न करता पिढ्यान्‌पिढ्या सैन्यात शहीद झाले अशा काही सैनिक व त्यांचे कुटुंबीय शौर्याची, वीरत्वाची पदके परत करू इच्छितात. अशा पाच हजार सैनिकांच्या सहा प्रतिनिधींना तुरुंगात डांबणारे हे निर्दयी निष्ठुर सरकार मातीत गाडण्यासाठी शेतकरी सज्ज झाला असून, आंदोलन सुरूच राहील. तीन काळे कृषी विधेयके म्हणजे देशातील 80 कोटी जनतेला अन्न सुरक्षा अधिकारापासून वंचित ठेवण्याचा घातकी डाव आहे. साठेबाजी, मनमानी कारभाराला मोकळीक देऊन देश विकू पाहात आहे. हे कदापि आम्ही होऊ देणार नाही, असा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. 

ऍड. शेख म्हणाले, आज भारतातील शेतकरी धान्य, भाजीपाला, फळे, दूध व दुग्धजन्य पदार्थ शेती व शेतीवरील सहव्यवसाय करतात. त्यांना त्यांच्या उत्पादनाच्या दीडपट अर्थातच 50 टक्के हमीभाव मागत आहे. पण सरकार आज शेतकऱ्यांना संपवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळावरील नियंत्रण काढून घेण्यासाठी बड्या भांडवलदारांना, करबुडव्यांना विकण्यासाठी आणि आंदण म्हणून देण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. 

या वेळी प्रकाश जाधव, सिटूचे जिल्हा कोषाध्यक्ष दीपक निकंबे, रंगप्पा मरेड्डी, प्रा. अब्राहम कुमार, माजी नगरसेविका शेवंता देशमुख आदी उपस्थित होते. सिटूचे राज्य सचिव युसूफ मेजर, अखिल भारतीय किसान सभेचे नेते सिद्धप्पा कलशेट्टी, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा, माजी नगरसेविका नसीमा शेख, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक अशोक इंदापुरे आदींनी सभेला संबोधित केले. कार्यक्रमाची सुरवात 34 शहीद शेतकऱ्यांना अभिवादन व श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. अनिल वासम यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com