श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर वज्रलेप; कशी असते प्रक्रिया वाचा

अभय जोशी
Tuesday, 23 June 2020

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झीज झाल्यामुळे दोन्ही मूर्तींवर वज्रलेप करण्यात येत आहे. आज मूर्ती स्वच्छ केल्या जाणार असून उद्या प्रत्यक्ष वज्रलेपाचे काम केले जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झीज झाल्यामुळे दोन्ही मूर्तींवर वज्रलेप करण्यात येत आहे. आज मूर्ती स्वच्छ केल्या जाणार असून उद्या प्रत्यक्ष वज्रलेपाचे काम केले जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
औसेकर महाराज म्हणाले, यासंदर्भात श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य तसेच सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद महाराज अमळनेरकर, चैतन्य महाराज देगलूरकर,  विठ्ठल दादा वासकर, माधव महाराज शिवणीकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत समन्वयाने निर्णय घेण्यात आला. ही बैठक झाल्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोवळे नेसून कामाला सुरुवात केली आहे. पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार ही रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. यामध्ये मूर्तीवर एक प्रकारचे लेपन केले जाते. चार-पाच  वर्षानंतर हा लेप झिजल्यावर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करून पुन्हा ही प्रक्रिया करावी लागत आहे. वारकरी संप्रदायातील काही मंडळींचा अशा पद्धतीने रासायनिक प्रक्रिया करण्यास विरोध आहे तथापि मूर्ती पुरातत्त्व विभागाच्या ताब्यातील आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या सुचनेनुसार आम्हाला काम करणे बंधनकारक आहे. भगवंताला चालणार नाही, अशा प्रकारचा द्रव ही प्रक्रिया केली जात असताना वापरला जात नाही, असे औसेकर महाराज यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा व त्यांचे चार सहकारी रासायनिक लेपन प्रक्रियेचे काम करत आहेत. दरम्यान राष्ट्रीय वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी रासायनिक प्रक्रिया करण्यास विरोध दर्शवला आहे ते म्हणाले मूर्तीचे संवर्धन केले पाहिजे परंतु रासायनिक प्रक्रियेला आमचा विरोध आहे. त्याऐवजी आयुर्वेदिक पद्धतीने प्रक्रिया केली जावी अशी आमची मागणी आहे संबंधित विषयातील तज्ज्ञांची समिती नेमून निर्णय घेतला पाहिजे मंदिर समिती अनाठाई घाई करत आहे.

श्री विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची माहिती
सध्याची श्रीविठ्ठल मूर्ती बाराव्या शतका पूर्वीची आहे असे मानले जाते. वालुकाश्म प्रकारच्या पाषाणातील ही मूर्ती आहे. श्री रुक्मिणीमातेची मूर्ती नेपाळ मधील गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या गुळगुळीत पाषाणापासून बनवण्यात आलेली असल्याचे सांगितले जाते.  श्रीविठ्ठलाची मूर्ती काहीशी खडबडीत तर श्री रुक्मिणी मातेची मूर्ती अतिशय रेखीव अशी आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीस पूर्वी दिवसातून अनेक वेळा महापूजेच्या निमित्ताने दही, दूध, मध, साखर वापरून अभिषेक केला जात असे. दिवसातून अनेक वेळा होणाऱ्या अशा महापूजा मुळे दोन्ही मूर्तींची वेगाने झीज होत होती. हे लक्षात घेऊन सुमारे आठ वर्षापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांकडून केल्या जाणाऱ्या महापूजा पूर्ण बंद केल्या. तेव्हापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची  फक्त पहाटेची नित्यपूजा मंदिर समितीच्या माध्यमातून केली जाते. तथापि लाखो भाविकांकडून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेतले जाते. त्यामुळे दर पाच वर्षांनी वज्रलेप करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना पुरातत्व विभागाने केलेल्या आहेत. यापूर्वी 1988, 2005 आणि 2012 मध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वज्रलेप प्रक्रिया करण्यात आली होती. 2012 नंतर मात्र वज्रलेप प्रक्रिया झालेली नव्हती. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यासंदर्भातील ठराव करून औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पंढरपूरला बोलवून त्यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची तसेच संपूर्ण मंदिराची पाहणी करून घेतली होती. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वज्रलेप प्रक्रिया करण्याविषयी अहवाल दिल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मार्च 2020 मध्ये विधी व न्याय विभागाकडे रासायनिक लेपन प्रक्रिया करून घेण्याविषयी परवानगी मागितली होती. शासनाने परवानगी दिल्यानंतर आता प्रक्रिया करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of members Shri Vitthal Rukmini Temple Committee and Advisory Committee at Pandharpur