दुकाने सुरु करण्याच्या मागणीसह व्यापारी महापालिकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यातील उद्योगाला सवलती दिल्या आहेत, मग महापालिका हद्दीतच बंदी का, असा प्रश्न यावेळी व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. 

सोलापूर - जिल्ह्यातील व्यवसाय सुरु झाले, शहरातील व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करीत सोलापूर शहरातील व्यापाऱ्यांनी आज शनिवारी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी माजी आमदार दिलीप माने, केतन शहा, मोहन सचदेव यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी आमदार सुभाष देशमुख यांचे पत्र आयुक्तांना देण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून दुकाने बंद असून ते सुरु करण्यास परवानगी द्यावी. या कालावधीत व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर शेजारील इतर जिल्ह्यात व्यापार सुरु आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागातही व्यापार सुरु आहे. त्यामुळे नियम व अटींचे पालन करून सोलापूर शहरातील व्यापार सुरु करण्यासही परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. तसेच येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना बोलून घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यातील उद्योगाला सवलती दिल्या आहेत, मग महापालिका हद्दीतच बंदी का, असा प्रश्न यावेळी व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: merchant went corporation with the demand to start shops