हक्क आहेत तशी काही कर्तव्येही आहेत, याची ठेवा जाणीव ! "यिन'च्या संवादामध्ये तरुणाईचा संदेश 

YIN
YIN

सोलापूर : "प्रजासत्ताक' या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यासाठी कृती करण्याची वेळ आज आली आहे. हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशाच्या नागरिकांनी हक्क व अधिकाराबाबत जागरूक व आग्रही असताना कर्तव्यपालनाची जाणीव ठेवणे आवश्‍यक आहे, असा संदेश युवकांच्या विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. 

"सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)च्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन व प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने "सकाळ' कार्यालयात "भारतीय संविधान आणि माझी जबाबदारी' या विषयावर तरुणाईशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी युवकांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

या वेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेश जगताप यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता ही भारतीय संविधानाची मूलभूत तत्त्वे आहेत. ही तत्त्व युवकांनी निर्धारपूर्वक आचरणात आणली तरच संविधानाचा हा निश्‍चय पूर्णत्वास जाऊ शकतो. जात, धर्म व वर्ण या भेदांच्या पलीकडे जाऊन आपण प्रथम भारतीय आहोत ही समज घेऊन समाजात सामंजस्य व बंधुभाव निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपले वर्तन असायला हवे. सार्वजनिक संपत्तीचे जतन व संवर्धन करणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, दुर्बलांना मदत करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. 

या वेळी मयूर जव्हेरी, सौरभ वाघमारे, दिनेश मठपती, अमरदीप वायगावकर, अभिजित गव्हाणे, रणधीर तोरणे, सागर कटकधोंड, स्नेहित दुधाळे, ओंकार चौधरी आदी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा आहे. तरुणांनी संविधान समजून घेणे आणि त्याचे पालन करणे आवश्‍यक आहे. लोकशाहीमध्ये युवकांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 
- मंदार कुलकर्णी 
स्मरण बहुद्देशीय सामाजिक संस्था 

समतेचे मूल्य अधिक प्रखरतेने राबवण्याची गरज जाणवते. अहिंसा हेही महत्त्वाचं मूल्य आहे. तेही तितक्‍याच ताकदीने पुढे न्यायला हवं. लोकांनी आपल्यातील प्रत्येकासाठी फक्त सुरक्षितच नाही, तर सन्मानजनक आयुष्याची कास धरायला हवी. 
- श्रेयश माने 
वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद 

सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही ही संकल्पना समाजात रुजवणे ही आजच्या युवकांची जबाबदारी आणि उद्याची गरजही आहे. संवैधानिक मूल्याधिष्ठित समाज निर्माण होण्यासाठी युवकांनी प्रयत्नशील व्हायला हवे. 
- तुषार रमेश आवताडे 
भारतीय विद्यार्थी सेना 

"प्रजासत्ताक' या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यासाठी कृती करण्याची वेळ आज आली आहे. प्रजासत्ताक दिन साजरा करताना त्याचे मूल्य जगायला आपण विसरू नये. 
- अनिकेत प्रधाने, 
अभाविप 

हक्क आहेत तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशाच्या नागरिकांनी हक्क व अधिकाराबाबत जागरूक व आग्रही असताना कर्तव्यपालनाची जाणीव ठेवणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. धनंजय मोगले, 
रासेयो विभागप्रमुख वसुंधरा महाविद्यालय 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com