करमाळा तालुक्‍यात आले स्थलांतरित पक्षी ! "सैराट'मधील "भोरडी'च्या थव्यांचे आकाशात मुक्त विहार 

दस्तगीर मुजावर 
Friday, 20 November 2020

हिवाळ्याला सुरवात झाली की जशी गुलाबी थंडीची चाहूल लागते तसे या थंडीबरोबरच अनेक पाहुणे आपल्या भागात यायला सुरवात करतात. हे पाहुणे म्हणजे सुंदर असे पक्षी. आपल्या परिसरातील शेतात, झाडांवर, माळरानावर व पाणथळ जागी या पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरवात होते. 

पांडे (सोलापूर) : हिवाळ्याला सुरवात झाली की जशी गुलाबी थंडीची चाहूल लागते तसे या थंडीबरोबरच अनेक पाहुणे आपल्या भागात यायला सुरवात करतात. हे पाहुणे म्हणजे सुंदर असे पक्षी. आपल्या परिसरातील शेतात, झाडांवर, माळरानावर व पाणथळ जागी या पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरवात होते. 

करमाळा तालुक्‍यातही स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची सुरवात झाली आहे. यामध्ये सर्वप्रथम स्थलांतरित होणाऱ्या भोरड्या पक्ष्याची नोंद गणेश सातव यांनी केली आहे. या वेळेस धरणातील पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांना आवश्‍यक असणाऱ्या पाणथळ जागा उपलब्ध नाहीत, त्यामुळे पक्ष्यांचे स्थलांतर लांबलेले आहे. 

भोरडी पक्ष्याचे इंग्रजी नाव हे रोझी स्टर्लिंग असे आहे. हे पक्षी पूर्व युरोप आणि पश्‍चिम व मध्य आशिया येथून स्थलांतर करून भारतात येतात. हिवाळ्यात आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांपैकी हा सर्वांत अगोदर येणारा पक्षी आहे. यांचे लहान - लहान थवे साधारणतः 500 किंवा अधिक संख्येने येतात. 

हा गुलाबी रंगाचा मैनेसारखा दिसणारा पक्षी आहे. याचे डोके, मान, छातीचा वरील भाग, पंख आणि शेपटी चमकदार काळ्या रंगाची असते. याचा लांब, टोकदार तुरा माथ्यावर व मानेवर पडलेला असतो. तरुण आणि पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांचा हिवाळ्यातील पिसंसंभार मळखाऊ व तपकीरसर रंगाचा असतो. या पक्ष्याला गुलाबी मैना असेही म्हणतात. मे-जून हा त्यांचा विणीचा हंगाम आहे. भारताबाहेर पूर्व युरोप, पश्‍चिम व मध्य आशियातील वसाहतींत त्यांची वीण होते. विणीचा हंगाम संपताच ते भारताकडे स्थलांतरित होण्यास सुरवात करतात. सुमारे एप्रिलपर्यंत त्यांचा मुक्काम आपल्या भागात असतो. 

ज्वारी पिकाच्या आसपास या पक्ष्यांचा थवा आपल्याला पाहायला मिळतो. हे पक्षी परिपक्व होणारे ज्वारीचे धान्य खातात. याचबरोबर हे पक्षी टोळांचा फडशा पाडतात. यामुळे हे पक्षी शेतीस उपकारक ठरतात. या पक्ष्यामुळे परागकणांची देवाण-घेवाण होऊन वनस्पतींच्या पुनर्निर्मितीच्या क्रियेस चालना मिळते. 

सैराट चित्रपटामध्ये भोरडी या पक्ष्यांचा थवा आपल्याला पाहायला मिळतो. या पक्ष्याला थव्याने आकाशात विहारताना पाहण्याचा आनंदच काही वेगळा आहे. करमाळा तालुक्‍यात विविध ठिकाणी असे अनेक स्थलांतरित पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. या पक्ष्यांचे निरीक्षण करण्याचा आनंद व त्यांचे आपल्या परिसंस्थेमधील महत्त्व विद्यार्थी व नागरिकांनी समजावून घेणे गरजेचे आहे. 
- गणेश सातव, पर्यावरण विषयी अभ्यासक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migratory birds came to Karmala taluka