एमआयएमचा दत्तात्रय सावंत यांना पाठिंबा, शहराध्यक्ष फारूक शाब्दी : सोलापूर महापालिका निवडणुकीत एमआयएम घडवेल चमत्कार 

प्रमोद बोडके
Friday, 27 November 2020

शाब्दी विधानसभेत जावेत 
शिक्षकच्या या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीला एमआयएमएस सहकार्य दिलेला पाठिंबा नव्या समिकरणांची नांदी आहे. या निवडणुकीत दत्तात्रय सावंत विजयी झाल्यानंतर सोलापुरातील त्यांची पहिली भेट ही एमआएमच्या कार्यालयाला असेल. शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विधान परिषदेत दत्तात्रय सावंत विधान परिषदेत जाणार हे निश्‍चित आहेत. त्यांच्यासोबतच आपल्या सर्वांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी एमआयएमचे फारूक शाब्दी हे देखील विधानसभेत जावेत अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर यांनी व्यक्त केली. 

सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार व माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना पाठिंबा दिल्याची घोषणा शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. सर्वसामान्य शिक्षकांच्या मदतीला धावून जाणारे, शिक्षकांच्या अडी-अडचणी सोडविणारे, धर्म निरपेक्ष व सर्वसमावेश उमेदवार म्हणून आम्ही सावंत यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. 

एमआयएमच्या सोलापूर शहर कार्यालयात आज सायंकाळी झालेल्या बैठकीला एमआयएमच्या नगरसेविका वाहिदा भंडाले, नगरसेवक गाझी जहागिरदार, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, शहराध्यक्ष सरदार नदाफ, साजिद शहाभाई, कृती समितीचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सुरेश नलुरे, शिवानंद तेगीनकेरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहराध्यक्ष शब्दी म्हणाले, विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीत मतदारांना जो उमेदवार योग्य वाटेल त्याला एमआयएमच्या मतदारांनी मतदान करावे. शिक्षकसाठी मात्र अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांनाच मतदान करावे. बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमला मिळालेल्या घवघवीत यशामुळे संपूर्ण देशातील एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. 2022 मध्ये होणाऱ्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएम चमत्कार करून दाखवेल असा विश्वासही शहराध्यक्ष शाब्दी यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्यासाठी एमआयएमने तयारी सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM backs Dattatraya Sawant, City President Farooq Shabdi: MIM will work miracles in Solapur municipal elections