शहराच्या पाणीप्रश्‍नावर "एमजेपी'चा 349 कोटींचा प्रस्ताव ! 8 टाक्‍या, 2 ट्रिटमेंट प्लॅंटसह 164 किलोमीटर पाइपलाइन 

Water Suply
Water Suply
Updated on

सोलापूर : शहरातील पाणीप्रश्‍न कायमचा सुटावा, या हेतूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 349 कोटी 73 लाख 41 हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार वॉटर ट्रिटमेंट प्लॅंटपासून ते नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहच करण्याच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. आता तो प्रस्ताव शासनदरबारी पाठविला जाणार आहे. 

शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या कारणांचा शोध महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घेण्यात आला. या कामांच्या अंतिम सर्व्हेसाठी 68 लाख 90 हजारांचा खर्च होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आराखड्यानुसार पाकणी येथे 50 एमएलडी तर सोरेगाव याठिकाणी 80 एमएलडी क्षमतेचा वॉटर ट्रिटमेंट प्लॅण्ट (जलशुध्दीकरण केंद्र) टाकला जाणार आहे. पाकणी प्लॅण्टमधील पाणी कोंडी येथील एमबीआरपर्यंत तर सोरेगाव येथील पाणी नेहरु नगर आणि जुळे सोलापुरातील एमबीआरपर्यंत (पंपहाऊस) आणले जाणार आहे. दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रांवरुन पंपहाऊसपर्यंत पाणी आणण्यासाठी 19 किलोमीटरची नवी पाईपलाईन टाकावी लागणार असल्याचेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्यांच्या आराखड्यात नमूद केले आहे. जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी शहरात आणण्यासाठी कोंडी, नेहरु नगर व जुळे सोलापुरात नव्याने पंपहाउस बांधले जाणार असून त्यासाठी साधारणपणे 18 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शहराच्या तुलनेत कमी सोयी-सुविधा असतानाही हद्दवाढ भागातून महापालिकेला सर्वाधिक महसूल मिळतो. या पार्श्‍वभूमीवर आता प्रशासनाने या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचे युध्दपातळीवर नियोजन सुरु केले आहे. 

आराखड्यातील प्रस्तावित कामे... 

  • वॉटर ट्रिटमेंट प्लॅंट : 30.15 कोटी 
  • वॉटर पंपिंग मशिन : 13.36 कोटी 
  • शुद्ध पाणीपुरवठा पाइपलाइन : 29.56 कोटी 
  • तीन "एमबीआर' : 17.48 कोटी 
  • पाण्याच्या टाक्‍या : 15.10 कोटी 
  • शहरांतर्गत पाइपलाइन : 31.76 कोटी 
  • पाणीपुरवठा पाइपलाइन : 67.65 कोटी 
  • पाणी मीटर : 122.41 कोटी 

हद्दवाढ भागात 164 किलोमीटरची पाइपलाइन 
कसबे सोलापूर (पांढरे वस्ती), शेळगी, कसबे सोलापूर (विनायक नगर), मजेरवाडी (होटगी रोड), सोरेगाव (विजयपूर रोड), पोलिस आयुक्‍तालयासमोर, जिल्हा परिषद परिसरातील कॉंग्रेस भवनजवळ आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामागील बाजूस नव्या टाक्‍या बसविण्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्रास्तावित केले आहे. तर हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 164 किलोमीटरची पाईपलाईन टाकावी लागेल, असेही आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. नव्याने केलेल्या कामांच्या ठिकाणी वॉल कंपाउंड, गेट, रस्ता तयार करण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी 11 लाखांचा निधी लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित मक्‍तेदाराने एक वर्ष आराखड्यानुसार पाणीपुरवठा होत असल्याचे सिध्द करावे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. 

नागरिकांना मीटरद्वारे दिले जाईल पाणी 
सध्या सुमारे 180 एमएलडी पाणी घेऊनही नागरिकांपर्यंत 90 एमएलडी एवढेच पाणी पोहचते. त्यासाठी गळती आणि पाणी चोरीची प्रमुख कारणे आहेत. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आता त्यांचा आराखडा महाराष्ट्र सरकारला सादर करणार असून त्यासाठी अमृत अथवा नगरोत्थान योजनेतून निधी अपेक्षित आहे. महापालिकेलाही काहीसा हिस्सा भरावा लागणार आहे. मात्र, सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनीचे काम झाल्यानंतर संपूर्ण शहराला मीटरद्वारे पाणी दिले जाणार असून त्यासाठी 122 कोटी 41 लाख 19 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. परंतु, मीटरद्वारे पाणीपुरवठा केल्याने पाणीचोरी उघड होईल, असा विश्‍वास प्राधिकरणाने व्यक्‍त केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com