निरुपयोगी आमदारांच्या यादीत तुम्ही सर्वांत वर : आमदार भालकेंची माजी पालकमंत्री देशमुखांवर टीका 

हुकूम मुलाणी 
Tuesday, 20 October 2020

राज्यातील सर्वांत निरुपयोगी आमदारांची यादी तपासली तर आपण सर्वांत वरच्या क्रमांकावर आहात, हे विसरू नका, अशी टीका आमदार भारत भालके यांनी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर केली. तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करून कामे करावीत, असा सल्लाही श्री. भालके यांनी श्री. देशमुख यांना दिला. 

मंगळवेढा (सोलापूर) : राज्यातील सर्वांत निरुपयोगी आमदारांची यादी तपासली तर आपण सर्वांत वरच्या क्रमांकावर आहात, हे विसरू नका, अशी टीका आमदार भारत भालके यांनी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर केली. तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करून कामे करावीत, असा सल्लाही श्री. भालके यांनी श्री. देशमुख यांना दिला. 

"उपमुख्यमंत्री अजित पवार हे नामधारी उपमुख्यमंत्री' अशी टीका माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली होती. त्यास आमदार भालके यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 2015 च्या दुष्काळात अधिवेशन काळात 394 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी मी व गणपतराव देशमुख यांनी केल्यावर तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फक्त 52 कोटी रुपये दिले. उर्वरित 350 कोटी न देता आपल्याच कार्यकाळात पैसे माघारी पाठवून शेतकऱ्यांच्या पदरात माती टाकण्याचे काम केल्याने आपण कामसू आहात, हे जनतेला माहीत आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊन देखील विमा दिला नाही, याबद्दल जाब विचारू शकला नाहीत. आपल्या निष्क्रियतेचा फटका जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बसला. 

भालके पुढे म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांच्या मंगळवेढ्यातील राष्ट्रीय स्मारक समितीच्या अध्यक्षपदी असताना पाच वर्षात केवळ घोषणेशिवाय नामधारी का राहिलात? संतांच्या परंपरेतील उपेक्षित संत चोखामेळा यांच्या स्मारकाबाबत मी सभागृहात आवाज उठवल्यानंतर शासनाकडून स्मारकाबाबत घोषणा झाली. परंतु पालकमंत्री म्हणून आपण निधी मिळवण्याबाबत आपली उदासीनता बघायला मिळाली. मंगळवेढ्यातील कृष्ण तलाव सुशोभीकरण करून देणार असे तलाव पाहणी करण्यास आल्यानंतर मंगळवेढेकरांना शब्द दिलात, तेव्हा नामधारी होता का? 

राईनपाडा हत्याकांडातील मृताच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत, शासकीय नोकरीत सामावून घेणे व घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या मागणीवर मी कटिबद्ध आहे, असे सांगूनही त्यांना शासकीय नोकरी व घरकुलही मिळाले नाही. पुढे आपण का निष्क्रिय राहिलात, याचे कारण समजले नाही. प्रधानमंत्री मोदींनी बारामतीसारखे देशात शंभर शहरे निर्माण झाली तर देश विकसित होईल, असे विधान बारामतीत येऊन केले असताना कार्यकर्तृत्ववान उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण रबर स्टॅम्प म्हणत असाल तर सोलापुरात एक दगडदेखील स्मार्ट सिटीच्या उभारणीत आपण लावू शकला नाहीत, याला निष्क्रियतेचा कळस म्हणणे सोयीचे ठरेल. सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेली स्वतंत्र पाइपलाइन योजना आपणाला पूर्णत्वास नेता आली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवत असताना आपणाला जेल भोगावी लागली, हे कोणत्या निष्क्रियतेचे लक्षण आहे? 

वस्त्रोद्योग खाते जिल्ह्याच्या मंत्र्याकडे असताना नरसिंग गिरजी मिलच्या जागेत गारमेंट पार्क उभा करण्याची घोषणा केली, त्या घोषणेचे काय झाले? शहरातील राजकीय कुरघोडीतून सवड मिळाली नाही आणि सांभाळलेल्या मंत्रिपदाच्या काळात विविध खात्याला न्याय दिला असता तर राज्याला फायदा झाला असता. एका चौकात बसून अनेक वर्षे घालवलेल्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा उपरोधिक टोला आमदार भालके यांनी दिला. 

सोलापूरसाठी विमानतळाबाबत आलेल्या प्रस्तावाला त्याच क्षणी निधी अजितदादानी मंजूर केला. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भर दुपारी झोपा काढल्या नसत्या तर विमानतळ उभे राहिलेले दिसले असते. उजनी धरणातील पाण्याचे नियोजन करण्यात आलेल्या अपयशामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाणी मिळू शकले नाही. आरोग्य खात्याचा कारभार मंत्री म्हणून पाहत असताना जिल्ह्यातील रिक्त पदे आपल्या निष्क्रियतेने भरली गेली नाहीत, असे सांगत, जिल्ह्याला इतका पुळचट व दळभद्री पालकमंत्री जिल्ह्याने अनुभवला नव्हता, अशी टीकाही आमदार भालके यांनी केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bharat Bhalke made allegations against MLA Vijaykumar Deshmukh