सोलापूरच्या सामाजिक व राजकीय विश्‍वाला धक्का ! आमदार भारत भालके यांचे निधन 

अभय जोशी 
Saturday, 28 November 2020

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येऊन आमदारकीची हॅट्ट्रिक मिळवलेले आमदार भारत भालके (वय 60) यांचे पुणे येथे शुक्रवारी (ता. 27) रात्री साडे अकराच्या सुमारास निधन झाले.​

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येऊन आमदारकीची हॅट्ट्रिक मिळवलेले आमदार भारत भालके (वय 60) यांचे पुणे येथे शुक्रवारी (ता. 27) रात्री साडे अकराच्या सुमारास निधन झाले. 

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास होऊ लागल्याने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना डिसचार्ज मिळाल्यावर काही दिवसांनी त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने पुणे येथे त्यांच्यावर उपचार केले जात होते. काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

गेल्या काही वर्षांपासून आमदार भालके यांना किडनीचा त्रास होत होता. मुंबईतील डॉक्‍टरांकडे ते तपासणीसाठी जात असत. काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास जाणवू लागल्याने ते स्वतः पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेथून बरे होऊन एक दिवस ते पंढरपूरलाही आले होते; परंतु त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने 
त्यांच्यावर पुणे येथे उपचार करण्यात येत होते. आज (शुक्रवारी) दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. भारती यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सायंकाळी जाहीर केले होते. रात्री साडे अकराच्या सुमारास भालके यांचे निधन झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. 

कै. भालके यांच्या मागे श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक युवा नेते भगीरथ भालके, पत्नी, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bharat Bhalke passed away on Friday night