सोलापूरच्या सामाजिक व राजकीय विश्‍वाला धक्का ! आमदार भारत भालके यांचे निधन

Bharat Bhalke for Online.jpg
Bharat Bhalke for Online.jpg


पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येऊन आमदारकीची हॅट्रीक मिळवलेले आमदार भारत भालके (वय 60) यांचे पुणे येथे रात्री साडे अकराच्या सुमारास निधन झाले. 

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास होऊ लागल्याने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना डिसचार्ज मिळाल्यावर काही दिवसाने त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने पुणे येथील रुबी हॉल क्‍लिनिक मध्ये त्यांच्यावर उपचार केले जात होते. तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना किडनीचा त्रास होत होता. मुंबईतील डॉक्‍टरांकडे ते तपासणी साठी जात असत. काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास जाणवू लागल्याने ते स्वतः पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेथून बरे होऊन एक दिवस ते पंढरपूरला ही आले होते परंतु त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर पुणे येथे उपचार करण्यात येत होते. आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. भालके यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सायंकाळी जाहीर केले होते. रात्री साडे अकराच्या सुमारास भालके यांचे निधन झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. 

पंढरपूर तालुक्‍यातील सरकोली हे भालके यांचे मुळगाव. राजकारणात कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कामाला सुरुवात केली. औदुंबर आण्णा यांनी त्यांची श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी आणि त्यानंतर उपाध्यक्षपदी निवड केली होती. 
पुढे विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे आली. 

2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक शिवसेनेच्या वतीने लढवली.त्यामध्ये त्यांना अपयश आले परंतु नंतर त्यांनी जोमाने मोर्चेबांधणी केली. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले. विशेष म्हणजे श्री.मोहिते पाटील यांचा पराभव करुन ते आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. 

2014 मध्ये झोलेल्या निवडणूकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत परिचारक यांचा तर मध्ये भाजपा कडून मैदानात उतरलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते कै. सुधाकरपंत परिचारक यांचा त्यांनी पराभव केला. सलग तीन वेळा विजय मिळवून त्यांनी आमदारकीची हॅट्रीक साधली होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी घरात नसताना त्यांनी राजकीय क्षेत्रात यश मिळवत पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यावरील वर्चस्व सिध्द केले होते. त्यांनी गावागावात कार्यकर्त्याचे मोठे जाळे तयार केले होते. पांढरी टोपी, पांढरा शुभ्र पोषाख, पैलवानी शरीरयष्टी, दाढी असे त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्व होते. 

श्री.भालके यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती. त्यांनी कोल्हापूरातील तालमीत राहून कुस्तीचे शिक्षण घेतले होते. कुस्त्यांची अनेक मैदाने त्यांनी गाजवली होती. व्यायामाचे शरीर, बोलण्याचा ग्रामीण बाज, प्रभावी वक्तृत्व यामुळे त्यांची जिथे जाईल तिथे छाप पडत असे. कार्यकर्त्याला आपलेसे करुन घेण्याची त्यांची कला वैशिष्ठ्यपूर्ण होती. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बिघडलेली घडी पुर्ववत व्हावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ते प्रयत्नशील होते. 

आमदार भालके यांच्या पश्‍चात श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक युवा नेते भगिरथ भालके, पत्नी, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com