आमदार भालकेंचा हा लुक तुम्ही पाहिलाय का? 

अभय जोशी
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

आमदार भालके नेतृत्व करीत असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यंदा आर्थिक अडचणीमुळे सुरू होऊ शकलेला नाही. अध्यक्ष आमदार भालके आणि कारखान्याच्या संचालक मंडळामुळेच कारखान्यावर ही वेळ आली असल्याची टीका त्यांच्या विरोधकांकडून केली जात आहे.

पंढरपूर (सोलापूर) : तीन गुंड्यांचा पांढराशुभ्र शर्ट, विजार, डोक्‍यावर कडक इस्त्री केलेली टोपी, अशा पेहरावात वर्षानुवर्षे पंढरपूर-मंगळवेढ्याचे नागरिक आमदार भारत भालके यांना पाहात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रथमच शर्ट-पॅंट घातलेला आमदार भालके यांचा विमानतळावरील फोटो सोशल मीडियातून फिरू लागला अन्‌ चर्चा सुरू झाली भालके यांच्या न झालेल्या लंडन वारीची. सोशल मीडियातून कोणी ते लंडनला तर कोणी बॅंकॉकला गेले असल्याच्या कमेंट दिल्या अन्‌ कारखान्याच्या कामाच्या निमित्ताने दिल्लीला गेलेले आमदार भालके माहिती न घेता होत असलेली टीका पाहून हैराण झाले. 
आमदार भालके नेतृत्व करीत असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यंदा आर्थिक अडचणीमुळे सुरू होऊ शकलेला नाही. अध्यक्ष आमदार भालके आणि कारखान्याच्या संचालक मंडळामुळेच कारखान्यावर ही वेळ आली असल्याची टीका त्यांच्या विरोधकांकडून केली जात आहे. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांमधून देखील नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आमदार भालके प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून त्यांनी कारखान्यापुढील अडचणीचे गाऱ्हाणे मांडले. अनेक बॅंकांच्या अधिकाऱ्यांना भेटून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्यापही कारखान्यापुढील आर्थिक अडचण संपलेली नाही. 
दरम्यान, कायम पांढराशुभ्र तीन गुंड्यांचा शर्ट, विजार आणि टोपी घालणाऱ्या आमदार भालके यांचा प्रथमच शर्ट आणि पॅंटमधील फोटो काल सोशल मीडियावर झळकला. 
भालके यांचे सहकारी, मित्र संजय कोकाटे यांच्यासमवेतचा हा पुणे विमानतळावरील फोटो पाहून सोशल मीडियातून उलट-सुलट चर्चा सुरू झाली. विठ्ठल कारखाना अडचणीत असताना भालके हे लंडनला गेल्याचे अनुमान काढून त्यांच्या काही विरोधकांनी टीका सुरू केली. पंढरपूर-मंगळवेढ्यातील काहींनी तर ते बॅंकॉकला गेल्याची चर्चा सुरू केली. 
यासंदर्भात आमदार भालके यांच्याशी संपर्क साधला असता "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, सोशल मीडियावर फिरत असलेला आपला फोटो पुणे विमानतळावरील आहे. सध्या आपण दिल्ली येथे असून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात एनसीडीसीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो आहे. या कामाच्या निमित्ताने आपण दिल्लीत मुक्कामी आहे. बदल म्हणून आपण शर्ट-पॅंट असा पोषाख परिधान केला. याचा चुकीचा अर्थ काही मंडळी काढत आहेत. परदेशात फिरण्यासाठी गेलेलो नसून शुक्रवारी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे, असे भालके यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Bharat Bhalke visits Delhi