esakal | आमदार प्रशांत परिचारक गट लढवणार संत दामाजी साखर कारखान्याची निवडणूक ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Paricharak

तीन महिन्यात होणाऱ्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आमदार प्रशांत परिचारक गट लढवणार असून, त्यासंदर्भात कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक झाली आहे. 

आमदार प्रशांत परिचारक गट लढवणार संत दामाजी साखर कारखान्याची निवडणूक ! 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : तीन महिन्यात होणाऱ्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आमदार प्रशांत परिचारक गट लढवणार असून, त्यासंदर्भात कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक झाली आहे. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीबरोबरच कारखान्याच्या निवडणुकीची हालचालही सुरू झाली आहे. सहकारातील संस्था कशा चालवायच्या, याचा आदर्श परिचारक घराण्याने जपला आहे. दिवंगत मारवडी वकील व दिवंगत रतनचंद शहा यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून तालुक्‍यातील लोकांना सोसायटी कर्जातून भागभांडवल उभा करून हा कारखाना चालवला. 

संपूर्ण जग कोरोना महामारीत घरात बसले असताना, दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळाने 19 हजार सभासदांना अक्रियाशील करत मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी पोस्टाने नोटिसा पाठवून 28 हजार सभासदांपैकी मोजकेच नऊ हजार सभासद ठेवले. त्यातील चार ते पाच हजार लोकांच्या नावावर कारखान्याचा ऊस दाखवत बोगस क्रियाशील सभासद करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात संत दामाजी कारखान्याचे संचालक मंडळ यशस्वी ठरले. 

सध्या दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील सर्व सहकारी संस्थांतील सभासद मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी हा निर्णय घेतला व तो राज्यपालांकडे अध्यादेश काढण्यासाठी पाठविला. त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी करून अध्यादेश जारी केला.

तालुक्‍यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालकीचा श्री संत दामाजी साखर कारखाना राहावा व सभासदांना उसाचा रास्त भाव मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून श्री संत दामाजी कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पॅनेल स्वतंत्ररीत्या लढण्याचे ठरले आहे. त्या दृष्टीने लवकरच बैठका घेण्याचे ठरले असून कारखान्याची बांधणी करण्याची व सर्वसमावेशक पॅनेल तयार करण्याची तयारी असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील, युन्नूस शेख व अरुण किल्लेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  

संपादन : श्रीनिवास दुध्याल