आमदार रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर ! म्हणाले, वाढीव वीजबिलाची शहानिशा करण्याची गरज 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

कोरोना काळात विजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल, असे म्हणत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिला. 

सोलापूर : वाढीव वीज बिलाची शहानिशा करण्याची गरज आहे. वाढीव आलेले वीज बिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढेच बिल द्यावे, यासाठी सरसकट धोरण ठरवता येईल का, याचा अभ्यास राज्य सरकारने करावा असे मला वाटते. कोरोना काळात विजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल, असे म्हणत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिला. 

आमदार रोहित पवार हे पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या आधी बुधवारी (ता. 20) एक दिवस अगोदर सोलापुरात दाखल झाले. या वेळी त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी करत त्यांचे स्वागत केले. चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढत रोहित पवार हे पार्क चौपाटीवर पोचले. तेथील पदार्थांवर ताव मारत कार्यकर्त्यांशी गप्पाही मारल्या. 

या वेळी ग्राहकांना आलेल्या वीज बिलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला, याचा रिपोर्ट एमएसईबीने काढलाय का, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला तेव्हा आमदार रोहित पवार म्हणाले, ते काढले असतील तर त्याचा अहवाल काय आलाय हे पाहावे लागेल, असे सांगत, सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जा मंत्र्यांपर्यंत पोचवणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

या वेळी चौपाटीवरील खाद्यपदार्थांची प्रशंसा करत त्यांनी सांगितले की, माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या एक दिवस आधी मी आलो आहे. गेल्या वेळी आलो होतो तेव्हा मला कार्यकर्त्यांनी सोलापूरच्या पार्क चौपाटीबाबत सांगितले होते. त्यामुळे मी खास चौपाटीवरील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आलो आहे. या पार्क चौपाटीचा विकास करू, असे आश्‍वासनही दिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rohit Pawar expressed displeasure over the increased electricity bill