आमदार संजयमामा शिंदे ठरले "महाविकास'च्या एकीकरणाचा आश्वासक चेहरा 

sanjaymama shindhe
sanjaymama shindhe

सोलापूर : सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. की प्रत्येक शहराचा एक रंग असतो. सोलापूर शहराचा रंग हा भगवा आहे. पुण्याचाही रंग आता तो भगवा झाला आहे. त्यांचा हा दावा विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून साफ धुवून निघाला आहे. सोलापूर शहरात एवढी ताकद भाजपची आहे. तेवढीच किंबहुना त्यापेक्षाही मोठी ताकद कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे. या तिघांना एकसंघ ठेवणारे नेतृत्व आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यात नसल्याने, फाटाफुटीचे आणि गटबाजीच्या राजकारणात भाजपने सोलापूर शहरावर ताबा मिळविला आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून या तिघांना एकत्रित करणारा आश्वासक चेहरा करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांच्या निमित्ताने पुढे आला आहे. 

2017 मध्ये झालेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करावी असा निरोप राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही या आघाडीला दुजोरा दिला होता. दोन्ही कॉंग्रेसमधील नेत्यांमधला संवाद कमी पडला आणि महापालिकेच्या 2017 च्या या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होऊ शकली नाही. सोलापूर महापालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळाली. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झालेला असताना सोलापूर महापालिकेत मात्र हा प्रयोग यशस्वी होऊ शकत नव्हता. महापालिकेच्या त्या निवडणुकीत तुटलेली आघाडी, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधान सभा मतदार संघात एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार दिलीप माने, महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते महेश कोठे यांना आमदार संजयमामा शिंदे यांनी पदवीधर व शिक्षकच्या निवडणुकीत एकाच व्यासपीठावर आणले. विशेष म्हणजे शहर मध्यमधील दिग्गज नेते एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांना पदवीधरच्या निवडणुकीत एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया आमदार संजयमामा शिंदे यांनी करुन दाखविली आहे. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला पदवीधर व शिक्षकच्या निवडणुकीसाठी सोबत घेत असतानाच महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नव्याने दोन्ही कॉंग्रेसचा मित्रपक्ष झालेल्या शिवसेनेलाही या निवडणुकीत सन्मानाने आणि विश्वासाने सोबत घेतले. सध्या एमआयएममध्ये असलेले व राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असलेले तौफिक शेख यांनाही या निवडणुकीत सोबत घेतल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. या सर्वांना एकत्रित घेतल्याने पुणे पदवीधर व शिक्षक च्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व जयंत आसगावकर हे विजयी झाले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून विक्रमी मताधिक्‍य महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांना मिळाले आहे. पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या माध्यमातून आमदार संजयमामा शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या एकीकरणाचा नवा पॅटर्न दिला आहे. हाच पॅटर्न येत्या काळात जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा, सोलापूर महापालिका, सोलापूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या अकरा तालुका पंचायत समित्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या शिवाय येत्या काळात सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुक होणार आहे. त्यासाठी देखील महाविकास आघाडीला या निवडणुकीतून आत्मविश्‍वासाचा सूर सापडला आहे. पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या विजयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. याचा मोठा लाभ आगामी काळात महाविकासआघाडीला होण्याची शक्‍यता आहे. पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या माध्यमातून झालेले तिन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोमिलन भविष्यातही कायम ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न अपेक्षित आहेत. 

जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या दिशेने संजयमामा शिंदे यांची वाटचाल 
सोलापूर जिल्ह्याचे एकहाती नेतृत्व म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची ओळख होती. सक्रिय राजकारणातून मोहिते-पाटील बाजूला गेल्यानंतर जिल्हा व्यापी नेतृत्वाची पोकळी अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी व राष्ट्रवादी पुरस्कृतचे असे एकूण चार आमदार आहेत. कॉंग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एक आमदार आहे. या सहा आमदारांपैकी एकालाही राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बाहेरच्या नेत्याकडे देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकाही नेत्याला मंत्रीपद न मिळाल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा नेता कोण? हा प्रश्न अनुत्तरितच होता. पदवीधर व शिक्षक निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या एकीकरणाचा पॅटर्न आमदार संजयमामा शिंदे यांनी निर्माण केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा सोलापूर जिल्ह्याचा नेता म्हणून आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com