
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे जनता विरोधी सरकार आहे. या सरकारने सर्वसामान्यांचे कोणतेच प्रश्न मार्गी लावले नाहीत. सरकारचा रोष शिक्षक व पदवीधरच्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसेल. या मतदार संघातून भाजपचे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील.
- विजयकुमार देशमुख, आमदार
सोलापूर : पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची धमक फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातून भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी केल्यास शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास माजी मंत्री भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी आज व्यक्त केला.
पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तरच्यावतीने महासंपर्क अभियान राबवण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून दमाणी नगर भागात आमदार विजयकुमार देशमुख यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या. पदवीधरमधून संग्राम देशमुख आणि शिक्षक मधून जितेंद्र पवार या दोन्ही मतदारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांच्या सोबत महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रेखा गायकवाड, प्रभाग सहाचे अध्यक्ष जगन्नाथ चव्हाण, रवी नामदास, अमर दुधाळ, मनोज पवार, अभय तारे, आप्पा हावळे, सचिन बॉबी शिंदे, श्रीकांत कौडगी, प्रभाकर भुसारे, अमोल मेहता, कुणाल नागमोडे, बसवराज जाधव, भारत गवळी,अश्विनी तारे, कामत मॅडम, नितेश माने उपस्थित होते. त्यानंतर प्रभाग आठ मध्ये त्यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठी भेटी घेतल्या. भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. नगरसेवक अमर पुदाले, नागेश भोगडे, बिप्पीन धुम्मा, सचिन कुलकर्णी, सुमित हब्बू, अमित जनगौड, सिद्धू खैराट, गणेश साखरे, प्रेम भोगडे यावेळी उपस्थित होते.