साखर कारखान्यांनी वीजबिल वसुलीचा साधा विचार जरी केला तर खळ्ळखट्याक ! मनसेचा इशारा

mns
mns

पंढरपूर (सोलापूर) : बारामती वीज परिमंडळ विभागाने साखर कारखान्यांच्या माध्यमातून वीजबिल वसुलीचा नवा फंडा अंमलात आणण्याचा विचार सुरू केला आहे. वीज वितरण कंपनीच्या या वीजबिल वसुलीला मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. साखर कारखान्यांनी वीजबिल वसुली करून देण्याचा साधा विचार जरी केला तरी साखर कारखान्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शॅडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. 

दरम्यान, येत्या 29 जानेवारी रोजी घरगुती आणि शेतीपंपाच्या थकीत वीजबिल माफीसाठी मनसेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही श्री. धोत्रे यांनी जाहीर केले. वीज बिल वसुलीवरून येत्या काही दिवसात सरकार आणि मनसेमध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 


श्री. धोत्रे म्हणाले, कोरोना, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अनेकांचा रोजगार गेला आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतातच सडून गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनी आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे आणि घरगुती वापराचे वीज बिल माफ करून दिलासा देण्याची गरज आहे. ऊर्जामंत्री आणि सरकारमधील इतर मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. मंत्रीच वीज बिलाबाबत परस्पर विरोधी विधाने करू लागली आहेत. यामध्ये सर्वसामान्य लोकांची कोंडी झाली आहे. 

कोरोना काळात वीज बिलात सवलत देऊ म्हणणारे सरकार आता वीजबिल भरा, अन्यथा वीजपुरवठा बंद करू, अशी धमकी देत आहेत. परंतु सरकारच्या अशा धमक्‍यांना शेतकरी भीक घालणार नाहीत. संपूर्ण वीजबिल माफ करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपुरातून सरकारच्या वीज बिल वसुलीला विरोध म्हणून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. येथील 29 जानेवारी रोजी हजारो शेतकऱ्यांचा शिवाजी चौकातून तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे. वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुली तातडीने थांबवावी, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल. 

वीज वितरण कंपनी आणि साखर कारखानदारांमध्ये वसुलीसाठी साटेलोटे सुरू आहे. राज्यातील एकाही साखर कारखान्याने वीजबिल वसुलीचा ठेका घेतला तरी त्या- त्या साखर कारखान्यांच्या दारात बसून आंदोलन करू. साखर कारखान्यांनी आधी शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे द्यावेत मगच वीज वितरण कंपनीचा बिल वसुलीचा ठेका घ्यावा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीज बिलाचा एक रुपयाही वसूल केला तरी कारखाने बंद पाडू, असा इशाराही या वेळी दिलीप धोत्रे यांनी दिला. 

या वेळी मनसेच्या वतीने पत्रकार दिन आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने पत्रकारांना तिळगूळ वाटप करून सन्मान करण्यात आला. या वेळी मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, सागर बडवे, महेश पवार आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com