मोबाईल फोन सॅनिटायजेशनमुळे स्क्रीन, डिस्प्ले, टच पॅड खराब होण्याचे वाढले प्रमाण !

विजयकुमार कन्हेरे 
Tuesday, 17 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी जाणारा प्रत्येक जण काळजी घेताना मोबाईलच्या बाह्य भागावर देखील सॅनिटायझरचा उपयोग करत असल्याने गेल्या काही महिन्यांत मोबाईलचे स्क्रीन, डिस्प्ले व टच पॅड खराब होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले असल्याचे दिसून येत आहे. 

कुर्डुवाडी (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी जाणारा प्रत्येक जण काळजी घेताना मोबाईलच्या बाह्य भागावर देखील सॅनिटायझरचा उपयोग करत असल्याने गेल्या काही महिन्यांत मोबाईलचे स्क्रीन, डिस्प्ले व टच पॅड खराब होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले असल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळा, वारंवार साबणाने हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा या नियमांचे पालन करावे लागले. मोबाईलबाबत सॅनिटायझरचा वापर करताना अनेकांना अडचणी येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोबाईल तर जवळपास सर्वच जण वापरतात. घरी आल्यानंतर किंवा कामाच्या ठिकाणी कार्यालयात गेल्यानंतर मोबाईल कोरोना विषाणूपासून दूर किंवा स्वच्छ करण्यासाठी नेमके काय करायचे, हे अनेकांना समजत नव्हते. काहीजण मोबाईल प्लास्टिकच्या आवरणात ठेवून वापरत आहेत. परंतु त्यावरून मोबाईलवर कॉल घेणे, करणे, विशेषतः इतर ऍप वापरणे अवघड जात आहे. त्यामुळे काहीजण मोबाईलला सॅनिटाइज करत होते. 

मोबाईलमध्ये बॅटरी असल्याने सॅनिटायझर सुद्धा काळजीपूर्वक वापरायला लागते. मोबाईलवर सॅनिटाइज करताना बऱ्याच वेळा सॅनिटायझर मोबाईलच्या आत जाते. त्यामुळे टच पॅड, डिस्प्ले खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

कुर्डुवाडी येथील श्री रेणुका मोबाईल दुरुस्ती व विक्री करणारे चेतन शिलके म्हणाले, की गेल्या काही महिन्यांत मोबाईल डिस्प्ले दुरुस्तीसाठी येणारे ग्राहक वाढले आहेत. मोबाईलवर सॅनिटायझरचा जास्त वापर करू नये. शक्‍यतो टिश्‍यू पेपरने कमीत कमी सॅनिटायझर वापरून काळजीपूर्वक हलक्‍या हाताने पुसावा. बाहेर जाताना गरज असेल तरच मोबाईल घेऊन जावा, म्हणजे सॅनिटाइज करण्याची आवश्‍यकता लागणार नाही. शक्‍य असेल तर मोबाईलला कव्हर वापरावे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile phones increased the risk of screen damage due sanitizer