महाप्रसाद, सरबत वाटपाने ताबूतचे विसर्जन; कोरोनामुळे बंधुभेटीचा सोहळा झाला रद्द

प्रमोद बोडके 
Tuesday, 1 September 2020

ताबूत स्थापनेच्या आठव्या दिवशी बडे मौलाली व छोटे मौलाली पंजांच्या भेटीचा सोहळा असतो. दुर्वेश पंजाची मशाल मिरवणूक दहाव्याच्या दिवशी काढली जाते. हा सर्व सोहळा पाहण्यासाठी सोलापुरातील व परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. या वर्षी कोरोनामुळे मात्र तलवार पंजांच्या भेटीचा सोहळा साजरा झाला नाही. 

सोलापूर : यंदा कोरोनाच्या संकटामुळे मोहरमनिमित्त निघणाऱ्या पंजांच्या सांगता मिरवणुका टाळण्यात आल्या. पंजांची ज्या ठिकाणी स्थापना झाली होती त्याच ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रम, विधी करून महाप्रसाद व सरबत वाटप करून मोहरमची सांगता करण्यात आली. सोलापूर मोहरम समितीच्या नेतृत्वाखाली बाराइमाम चौक युवक संघटनेच्या वतीने मोहरम निमित्त सरबत व महाप्रसाद वाटप करण्यात आला. 

हेही वाचा : Big Breaking ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह अकराशे ते बाराशे लोकांवर गुन्हा दाखल 

मोहरम समितीचे अध्यक्ष हाजी मकबुल मोहोळकर यांच्या हस्ते सरबत वाटपास प्रारंभ झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पानगलचे चेअरमन हाजी इमाम दरूद, सचिव रफिक जकलेर, विश्वस्त अ. कदीर अलीम, मोहरम समितीचे उपाध्यक्ष रियाज लोकापल्ली, खलील नालबंद, सचिव शकील मौलवी, खजिनदार इक्‍बाल दुर्वेश, अध्यक्ष अहमदअली मोहोळकर, ताजोद्दीन मोहोळकर, युनूस कुरेशी, नवाज मोहोळकर, जावेद खैरदी, अफजल होटगी, फकरोद्दीन उस्ताद यांच्यासह मोहरम समितीचे पदाधिकारी व भाविक या वेळी उपस्थित होते. "या हुसेन, या हुसेन'चा या वेळी उपस्थितांनी नारा दिला. 

हेही वाचा : सोलापूरकरांना आजपासून भरावा लागणार नवा कर! सत्ताधाऱ्यांवर टीका करीत "यांनी' केला विरोध 

मोहरमनिमित्त दरवर्षी भारतीय चौकात छोटे तलवार पंजे आणि बडे तलवार पंचांच्या भेटीचा सोहळा होतो. ताबूत स्थापनेच्या आठव्या दिवशी बडे मौलाली व छोटे मौलाली पंजांच्या भेटीचा सोहळा असतो. दुर्वेश पंजाची मशाल मिरवणूक दहाव्याच्या दिवशी काढली जाते. हा सर्व सोहळा पाहण्यासाठी सोलापुरातील व परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. या वर्षी कोरोनामुळे मात्र तलवार पंजांच्या भेटीचा सोहळा साजरा झाला नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moharram festival was celebrated with the distribution of syrup