मोहोळचे उपनगराध्यक्ष तलफदार यांचा राजीनामा; भावी उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे डोके यांच्या नावाची चर्चा 

राजकुमार शहा 
Saturday, 26 September 2020

मोहोळच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शाईन शेख यांची निवड होताच, उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे शौकत तलफदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

मोहोळ (सोलापूर) : मोहोळच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शाईन शेख यांची निवड होताच, उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे शौकत तलफदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

दरम्यान, राजीनाम्यावर प्रशासकीय सोपस्कार करून तो पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती नगराध्यक्षा शाहीन शेख यांनी दिली. येत्या सहा महिन्यांत मोहोळ नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे, त्यामुळे नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना काम करण्यासाठी फारच थोडा वेळ मिळणार आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख येत्या चार ते पाच दिवसांत जाहीर होणार असून, राष्ट्रवादीकडून प्रमोद डोके यांच्या नावाची चर्चा आहे. 

काम करण्यासाठी जेवढा कालावधी मिळणार आहे त्यातील एकेक तास महत्त्वाचा आहे. मिळालेल्या संधीचे सोने करत नागरिकांच्या आरोग्यासह शहराच्या स्वच्छतेच्या समस्यावर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगत, गटारी स्वच्छता, पाणीपुरवठा व वीज या समस्यांना प्राधान्य देणार असल्याचे श्रीमती शेख यांनी सांगितले. नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही श्रीमती शेख यांनी केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohol Deputy Mayor Talafdar resigns