esakal | खासदार डॉ. महास्वामी 'कॉफी विथ सकाळ'मध्ये म्हणाले ! पर्यटन, रोजगार अन्‌ विमानसेवेसाठी सुरु आहेत प्रयत्न

बोलून बातमी शोधा

40-1-380x214.jpg}

  जातीच्या दाखल्यावर खासदारांचे मौन 
  सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे असलेल्या अनुसूचित जातीच्या दाखल्याबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ व पोलिसात असल्याने यावर कोणतेही व कसलेही भाष्य करणे टाळले. 

  solapur
  खासदार डॉ. महास्वामी 'कॉफी विथ सकाळ'मध्ये म्हणाले ! पर्यटन, रोजगार अन्‌ विमानसेवेसाठी सुरु आहेत प्रयत्न
  sakal_logo
  By
  तात्या लांडगे

  सोलापूर : लोकसभा निवडणुकीत मी स्वत: जिंकून संसदेत गेलो नाही तर जनतेने मला विजयी करुन त्याठिकाणी पाठविले आहे. ज्या अपेक्षेने सर्वसामान्य लोक असो वा सुशिक्षित तरुण, मोलमजुरी करणारे लोक, उद्योजक, शेतकरी, विडी कामगारांसह अन्य घटकांचे प्रश्‍न मार्गी लावणे, केंद्राकडून जिल्ह्यासाठी अधिकाधिक काही योजना, प्रकल्प आणता येतील का, यादृष्टीने माझा प्रयत्न असल्याची माहिती खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी आज 'कॉफी विथ सकाळ'मध्ये दिली. त्यामध्ये अध्यात्मिक पर्यटनाबरोबरच इतर पर्यटनातही वाढ करणे, रोजगार उपलब्ध करुन देणे आणि सोलापूर जिल्ह्यात नवीन उद्योग वाढतील, यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी, 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले.

  खासदार महास्वामी म्हणाले... 

  • सोलापुरात अचिव्हर्स सेंटर व्हावे म्हणून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे पाठविणार प्रस्ताव 
  • केळी, द्राक्ष, ज्वारी, गहू, डाळींबसह अन्य शेतमालावर प्रक्रिया उद्योग सुरु व्हावेत म्हणून पाठपुरावा 
  • सोलापूर, अक्‍कलकोट, मंगळवेढ्यातील किल्ले सुशोभिकरण करून पर्यटनवाढीसाठी पुरातत्त्व विभागाकडे लवकरच बैठक 
  • हिप्परगा तलावासह अन्य ठिकाणी रशिया व अन्य देशांमधील पक्षी येतात; त्याठिकाणी पक्षीधाम उभारण्याचा प्रयत्न 
  • एकरुख योजनेतून काही महिन्यांतच अक्‍कलकोट तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मिळेल पाणी 
  • सेंट्रल वॉटर कमिशनला उजनीतील पाणीसाठ्याबद्दल सखोल अहवाल दिल्यास साठवण क्षमता व पाणी वाटपाचे करता येईल नियोजन 
  • विडी उद्योजक आणि या उद्योगावर अवलंबून कामगारांची सांगड घालून नवे नियोजन करण्याचा प्रयत्न 
  • सोलापूरचा विकास जयपूरच्या धर्तीवर करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटीसाठी मिळवून दिला जाईल निधी 

  खासदार डॉ. महास्वामी यांनी स्मार्ट सिटीतून सुरु असलेली कामे आणि जगाच्या पटलावर सोलापूरची होणारी नवी ओळख, रखडलेली विमानसेवा सुरु करण्यासंदर्भातील पाठपुरावा, सोलापूर ते मुंबई, सोलापूर ते दिल्ली रेल्वे, दुहेरीकरणाचा प्रश्‍न आणि मुंबई ते हैदराबाद हायस्पिड रेल्वेला सोलापूर येथे थांबा देणे, पर्यटनवाढीसाठी पुरातत्व खात्याकडून 'बीओटी' तत्त्वावर किल्ल्यांसह ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन व सुशोभिकरण करणे, होटगी रोडवरील विमानसेवा सुरू करणे आणि बोरामणी विमानतळासाठी निधी उपलब्ध करून देणे, उजनी धरणातील पाणी साठवण क्षमता वाढवून अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूरसह अन्य तालुक्‍यातील सर्वच शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे, रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावणे, स्मार्ट सिटीतून तयार झालेले सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडिअमवर रणजी सामने खेळविणे, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला आणखी जागा उपलब्ध करून देणे, मेडिकल हब म्हणून नावारुपाला येणाऱ्या सोलापूरसाठी आणखी काहीतरी प्रकल्प सुरु करणे, विडी उद्योगावर अवलंबून कामगारांसाठी ठोस उपाययोजना करणे, गारमेंट, वस्त्रोद्योगातील अडचणी दूर करणे, तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, म्हणून पर्यटन वाढीबरोबरच आणखी उद्योग वाढविणे, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरु करण्यासंदर्भात विविध खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा करुन त्यांच्या माध्यमातून हे प्रश्‍न आगामी काळात सोडविण्याचे नियोजन केल्याची माहितीही खासदारांनी यावेळी दिली. 

  उद्योगवाढीसाठी विमानसेवा गरजेचीच 
  पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी मोठी संधी आहे. अनेक उद्योजक सोलापुरात येण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु ते पहिला प्रश्‍न विमानसेवा सुरु आहे का, असा विचारतात. दिल्लीत दोन मोठ्या उद्योजकांना भेटलो, परंतु त्यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता. बोरामणी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध झाला, तरीही ते सुरु होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. विमानसेवा सुरु झाल्यानंतर उद्योग वाढतील आणि त्यातून अनेकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे होटगी रोडवरून विमानसेवा सुरु होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. होटगी रोड विमानतळासाठी सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीसह अन्य अडथळे असून ते दूर करावेत म्हणून काही दिवसांपूर्वी बैठक घेतली. विमानतळावर पाणी साचत असल्याने त्या कामासाठी निधी मिळवून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. महामार्गांची कनेक्‍टिव्हिटी वाढली, परंतु विमानसेवेची मोठी गरज सोलापुरात असल्याचे खासदार डॉ. महास्वामी यांनी यावेळी स्पष्ट केले. 

  रेल्वे मंत्र्यांसोबत केली सविस्तर चर्चा 
  केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यासमवेत सखोल चर्चा केली असून त्यामध्ये सोलापूरकरांसाठी खूप काही गोष्टी मागितल्या आहेत. त्यामध्ये वंदे मातरम्‌ ही रेल्वे सोलापूर ते मुंबई दररोज सुरु करावी, दिल्लीला जाण्यासाठी सध्या कर्नाटक एक्‍स्प्रेस ही एकमेव रेल्वे असल्याने प्रवाशांना दोन-तीन महिने आरक्षण मिळत नाही. त्यामुळे सोलापूर-दिल्ली अशी स्वतंत्र रेल्वे सुरु करावी, मुंबई-हैदराबाद हायस्पिड रेल्वेसंदर्भात पुण्यापर्यंत सर्व्हेक्षण झाले असून आगामी काळात या रेल्वेला सोलापूर येथे थांबा द्यावा, टिकेकरवाडी येथे टर्मिनल सुरु करावे, रेल्वेचे रखडलेले दुहेरीकरण पूर्ण करून विद्युतीकरणाचे काम लवकर पूर्ण करावे, अशा मागण्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.