सोलापूरच्या "टेक्‍स्टाईल'ला द्या विशेष आर्थिक पॅकेज : खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामींची सरकारकडे मागणी 

श्रीनिवास दुध्याल 
Monday, 21 September 2020

कोरोना संकटामुळे गारमेंट उद्योगातील जवळपास 350 कोटींच्या ऑर्डरी रद्द झाल्या. यंत्रमाग उद्योगातील उत्पादनांना नव्याने मागणी नसल्याने दररोजची साडेचार कोटींची उलाढाल निम्म्यावर आली आहे. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी अधिवेशनाला रवाना होण्यापूर्वी त्यांना येथील उद्योजकांनी भेटून उद्योजकांसमोरील अडचणी मांडल्या होत्या. तेव्हा हा प्रश्‍न अधिवेशनात मांडून वस्त्रोद्योगासमोरील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी उद्योजकांना दिले होते. 

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्चपासून सोलापुरात लॉकडाउन करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील यंत्रमाग व गारमेंट उद्योगाला याचा जबरदस्त फटका बसला असून, उत्पादन ठप्प झाले. 5 जूनपासून लॉकडाउन शिथिल करण्यात आला मात्र देश-विदेशातील ऑर्डर्स रद्द झाल्याने यंत्रमाग उद्योगातील उत्पादने 50 टक्‍क्‍यांवर आली व गारमेंट उद्योगात केवळ 10 टक्‍केच उत्पादने सुरू आहेत. त्यामुळे सोलापुरातील वस्त्रोद्योगाला सावरण्यासाठी सरकारने या उद्योगाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी संसदीय अधिवेशनाच्या शून्य प्रहर काळात केली. 

कोरोना संकटामुळे गारमेंट उद्योगातील जवळपास 350 कोटींच्या ऑर्डरी रद्द झाल्या. यंत्रमाग उद्योगातील उत्पादनांना नव्याने मागणी नसल्याने दररोजची साडेचार कोटींची उलाढाल निम्म्यावर आली आहे. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी अधिवेशनाला रवाना होण्यापूर्वी त्यांना येथील उद्योजकांनी व चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी व सदस्यांनी भेटून उद्योजकांसमोरील अडचणी मांडल्या होत्या. तेव्हा हा प्रश्‍न अधिवेशनात मांडून वस्त्रोद्योगासमोरील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी उद्योजकांना दिले होते. 

अधिवेशनात खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशाल दूरदृष्टीमुळे सोलापूर स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत आहे. सोलापूर आध्यात्मिक क्षेत्रासह टेक्‍स्टाईल व गारमेंट तथा युनिफॉर्म हब म्हणून ओळखले जाते. या उद्योगातील उत्पादनांना देशांतर्गत व विदेशातही मागणी असते. मात्र कोव्हिड-19 च्या आपत्तीमुळे सोलापुरातील टेक्‍स्टाईल व गारमेंट उद्योग आर्थिक संकटाला तोंड देत आहे. या उद्योगांना केंद्र शासनाने विशेष आर्थिक पॅकेज देणे अत्यंत आवश्‍यक आहे. सध्या या उद्योगांवर आलेल्या आपत्तीमुळे बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यास उद्योजक असमर्थ आहेत. या उद्योगांवर सोलापुरातील लाखो कामगारांचा रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो, की या उद्योजकांची वीजबिले व बॅंकांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज एप्रिल 2020 पासून माफ करावे. तसेच सरकारकडून या उद्योगांना आर्थिक मदत केल्यास सोलापुरातील टेक्‍स्टाईल व गारमेंट उद्योग पुन्हा सक्षम होण्यास मदत होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Jayasiddheshwar Mahaswami demands financial package for Solapur textile industry