कर्ज न देणाऱ्या बॅंकांना खासदार निंबाळकरांनी दिला "हा' इशारा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. नव्याने उद्योगधंदे सुरू करणाऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने मदत केली जाईल. यासाठी होतकरू तरुणांनी पुढे येऊन छोटे उद्योग उभारले पाहिजेत. यासाठी बॅंकांनी कर्ज दिले पाहिजे.

करमाळा (सोलापूर) : कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. नव्याने उद्योगधंदे सुरू करणाऱ्यांना केंद्र शासनाच्या वतीने मदत केली जाईल. यासाठी होतकरू तरुणांनी पुढे येऊन छोटे उद्योग उभारले पाहिजेत. यासाठी बॅंकांनी कर्ज दिले पाहिजे. जर शेतीसाठी, उद्योगांसाठी, जेसीबी, पोकलेनसाठी बॅंका कर्ज नाकारत असतील तर त्या बॅंकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली. 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्‍लिक करा 
करमाळा येथे कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अजित तळेकर, शंभुराजे जगताप, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, टायगर ग्रुपचे तानाजीभाऊ जाधव, सिनेट सदस्य दीपक चव्हाण, डॉ. अमोल घाडगे, अमरजित साळुंखे, ज्ञानेश पवार, विठ्ठलराव भणगे, भगवानगिरी गोसावी, किरण बोकन, अशोक ढेरे आदी उपस्थित होते. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, कोरोनामुळे सर्व प्रकारचा निधी वळवण्यात आला आहे. अशा काळात अनेक उद्योगधंदे बंद पडू लागले आहेत. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर काही उद्योगांना कामगार नाहीत, अशा परिस्थितीत तरुणांनी पुढे येऊन छोटे उद्योग उभारणे गरजेचे आहे. ही एक संधी समजली पाहिजे. भविष्यात शेतीच्या बांधाच्या व रस्त्याच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यावर भर देण्याचे आदेश आजच प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहेत. याशिवाय करमाळा तालुक्‍यातील रेशन दुकानांविषयी तक्रारी वाढल्या असून विहाळ व अर्जुननगर येथील रेशन दुकानदारांवर तत्काळ कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Ranjitsih Nimbalkar warnig banks not to give loans