ग्रामपंचायत बिनविरोध करा, राज्य तुमचा आदर्श घेईल ! खासदार संभाजीराजे भोसले यांचे आवाहन 

राजकुमार शहा 
Tuesday, 29 December 2020

खंडाळीला 1938 पासूनचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या बिनविरोध निवडीच्या माध्यमातून तो जपावा. एकसंघ ही काळाची गरज असून खंडाळीने केवळ खंडाळी न पाहता पंचक्रोशीतील गावेही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले. 

मोहोळ (सोलापूर) : खंडाळीने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. हे उदाहरण संपूर्ण राज्याला आदर्शवत आहे. खंडाळीला 1938 पासूनचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या बिनविरोध निवडीच्या माध्यमातून तो जपावा. एकसंघ ही काळाची गरज असून खंडाळीने केवळ खंडाळी न पाहता पंचक्रोशीतील गावेही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले. 

खंडाळी (ता. मोहोळ) ग्रामपंचायत बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे; मात्र खासदार संभाजीराजे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणखी त्यात इतर गावांचीही भर पडावी यासाठी खंडाळी ग्रामस्थांच्या निमंत्रणाला मान देऊन खासदार संभाजीराजे आले होते. त्या वेळी ते ग्रामस्थांना प्रबोधन करत होते. या वेळी माऊली ग्राम विकास आघाडीचे प्रमुख राजाभाऊ अंकुशराव, स्व. प्रभाकर मुळे ग्राम विकास आघाडीचे प्रमुख सचिन बाबर, माजी उपसरपंच गणेश मुळे, संभाजी ब्रिगेडचे चरणराज घाडगे, बाळासाहेब बागल, श्री. तळेकर, विकास पाटील यांच्यासह खंडाळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

खासदार संभाजीराजे म्हणाले, खंडाळीच्या या विचाराचे गांभीर्य ओळखून मी आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे हेच विचार आहेत की सर्वांना बरोबर घेऊन चला. निवडणुकीच्या माध्यमातून डोकेदुखी करू नका. माझी गरज पडली तर मला सांगा मी जरूर मदत करेन. भविष्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकाही बिनविरोध झाल्या पाहिजेत. गावातील भांडणे व भावकीतील वाद संपवायचे असतील तर त्याला ग्रामपंचायत बिनविरोध हा सर्वांत मोठा पर्याय आहे. छत्रपती घराण्याचे व खंडाळीचे नाते जुने आहे. त्यामुळे छत्रपती घराण्याचा अधिकार खंडाळीवर आहे. त्या माध्यमातून दोन्ही आघाड्यांच्या प्रमुखांनी विचार करून ग्रामपंचायत बिनविरोधचा निर्णय घ्यावा. एकसंघ राहणे ही सध्या काळाची गरज आहे. गाव बिनविरोध झाले तर मोठे सुख व विकास निधी मिळणार आहे. 

या वेळी स्व. प्रभाकर मुळे आघाडीचे प्रमुख सचिन बाबर यांनी, सर्वांना विचारात घेऊन आमच्या आघाडीतील कार्यकर्त्यांशी चर्चा करून बिनविरोधसाठी नक्की प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. तसेच माऊली ग्राम विकास आघाडीचे प्रमुख उद्योगपती राजाभाऊ अंकुशराव यांनी, आमच्या आघाडीची ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची इच्छा आहे, त्यास आमचा पाठिंबा राहील. दोन्ही गटांनी बसून चर्चा केली पाहिजे. त्यातून मार्ग निघेल, असे सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sambhaji Raje Bhosale appealed to create an ideal by holding Gram Panchayat elections without any opposition