शेतकऱ्याकडून लाच घेताना महावितरणच्या अभियंत्यास रंगेहात पकडले 

राजकुमार शहा 
शुक्रवार, 10 जुलै 2020

40 हजारांची मागितली लाच 
संबंधित अभियांत्याने आराखडा तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 35 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी पहिला हप्ता 20 हजाराचा देण्याचेही ठरले. 

मोहोळ (सोलापूर) : नवीन वीज जोडणीचा अहवाल व आराखडा तयार करून वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी नरखेड येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास वीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना शुक्रवार (ता 10) रोजी घडली. 
प्रशांत प्रकाश कुंभार (वय 53) असे लाच घेणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे. नरखेड येथील शेतकऱ्याला नवीन वीज जोडणी पाहिजे होती. त्यासाठी त्यांनी अभियंता प्रशांत कुंभार यांच्याकडे रीतसर मागणी केली होती. कुंभार याने नवीन वीज जोडणीचा अहवाल तयार करणे व आराखडा तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान, तडजोडीअंती 35 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी पहिला हप्ता 20 हजाराचा देण्याचेही ठरले. याबाबत संबंधित शेतकऱ्याने सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अभियंत्याविरोधात तक्रार केली. 
दरम्यान, तक्रारीची खातरजमा करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील, पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, हवालदार चंद्रकांत पवार, पोलिस नाईक परमानंद चंगरपल्लू, पोलिस कॉन्स्टेबल प्रफुल्ल जानराव, श्‍याम सुरवसे यांनी मोहोळ येथे सापळा लावला. यात पथकाने अभियंता प्रशांत कुंभार यांना रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL engineer caught red handed while taking bribe from farmers