पुणे विभागात महावितरणने केले व्हॉट्‌सऍपद्वारे आलेल्या 200 तक्रारींचे निवारण 

संतोष सिरसट 
Tuesday, 8 September 2020

ग्राहकांकडून व्यक्त केले जातेय समाधान 
जिल्ह्यात प्राप्त झालेली धोकादायक यंत्रणेची फोटोसह माहिती किंवा तक्रार तत्काळ संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहे. यंत्रणेची दुरुस्ती झाल्यानंतरचे छायाचित्र पाठवून संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येत आहे. या उपक्रमाचे अनेक ग्राहकांनी कौतुक केले आहे. तक्रारींनुसार दुरुस्तीची कामे लगेचच पूर्ण केल्याबाबत व्हॉट्‌सऍपवर ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 

सोलापूर ः महावितरणने पुणे विभागात वीज ग्राहकांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केले आहेत. त्यामाध्यमातून त्यांनी तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांच्याकडून आलेल्या 200 जणांच्या तक्रारीचे निवारण करण्यात महावितरणला यश आले आहे. व्हॉटसऍप ग्रुपचा सकारात्मक उपयोग करुन घेण्यात महावितरण यशस्वी झाली आहे. 

धोकादायक वीजयंत्रणेची माहिती किंवा तक्रारी व्हॉट्‌सऍपद्वारे पाठविण्याचे आवाहन महावितरणकडून केल्यानंतर सात सप्टेंबरपर्यंत पुणे प्रादेशिक विभागात 200 ठिकाणच्या वीजयंत्रणेची सुरक्षेच्या दृष्टीने योग्य दुरुस्ती करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 25 तक्रारींचा समावेश आहे. महावितरणकडून वीजसुरक्षेसाठी सुरु करण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. 
शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे, रोहित्रांचे कुंपण उघडे असणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी 7875440455 हा व्हॉट्‌सऍप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

जिल्ह्यात व्हॉट्‌सऍपद्वारे आतापर्यंत 25 ठिकाणी वीजयंत्रणा धोकादायक असल्याची माहिती प्राप्त झाली. महावितरणच्या संबंधीत कार्यालयांकडून 25 ठिकाणचे दुरुस्ती कामे तातडीने पूर्ण केली आहेत. वीज वितरण यंत्रणेतील धोके कमी करण्यासाठी व्हॉट्‌सऍ क्रमांकावर माहिती देण्याच्या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. 

व्हॉट्‌सऍपच्या मोबाईल क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून धोका असल्याची फोटोसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना कॉल करू नये. फक्त धोकादायक यंत्रणेचे स्थळ संपूर्ण पत्यासह किंवा गुगल लोकेशनसह द्यावे. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्‌सऍप नाहीत त्यांनी "एसएमएस'द्वारे पत्त्यासह माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच अशा तक्रारींसाठी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर थेट संपर्क साधून माहिती देता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL redresses 200 complaints received through WhatsApp in Pune division