महावितरणचा नवा उपक्रम एक गाव, एक दिवस 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

सोलापूर ः थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांचा एक गाव, एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाला जिल्ह्यात सुरवात झाली आहे. यामध्ये अक्कलकोट, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा व माढा तालुक्‍यातील 10 गावांमधील वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली. 

सोलापूर ः थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांचा एक गाव, एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाला जिल्ह्यात सुरवात झाली आहे. यामध्ये अक्कलकोट, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा व माढा तालुक्‍यातील 10 गावांमधील वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली. 

पावसाळा व त्यानंतरच्या कालावधीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून गेल्या दोन वर्षांपासून एक गाव-एक दिवस हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने गर्दी टाळण्यासाठी या उपक्रमातून सध्या वीजयंत्रणेच्या दुरुस्तीवर भर देण्यात आला आहे. तसेच सर्व कार्यालय, उपकेंद्र व परिसरांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 

सोलापूर ग्रामीण विभाग अंतर्गत शिरवळ (ता. अक्कलकोट), अकलूज विभागातील निमगाव (ता. माळशिरस), पंढरपूर विभागातील सिद्धेवाडी व टाकळी (ता. पंढरपूर), आंधळगाव (ता. मंगळवेढा), बार्शी विभागातील वाशिंबे, कात्रज, पांडे, सावडी (ता. करमाळा) व वाकव (ता. माढा) या 10 गावांमध्ये नुकताच एक गाव, एक दिवस उपक्रम झाला. यामध्ये रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्‍सचे क्‍लिनिंग व आवश्‍यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, जंप बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामे करण्यात आली. 

बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता संजीवकुमार शिंदे, दीपक लहामगे, अशोक जाधव, संजय गवळी, अमसिद्ध हुवाळे तसेच उपकार्यकारी अभियंता, अभियंते व जनमित्र यांच्यासह सुमारे 130 तंत्रज्ञ व कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL's new venture One Village, One Day