#Solapur : महापालिकेच्या स्क्रॅपला लागली आग 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 22 मार्च 2020

अग्निशमन दलाचे पथक येईपर्यंत आगीत बरेच साहित्य जळाले होते. याठिकाणी लाकडाचे ओंढके, जुने साहित्य, वाळलेले गवत असल्याने खूपच धूर बाहेर पडत होता. दुपारी सव्वा एकपर्यंत नऊ गाड्या पाणी मारून आग विझवण्यात आले.

सोलापूर : शासकीय रुग्णालयासमोरील महापालिका नगर अभियंता कार्यालयाच्या स्क्रॅपला रविवारी दुपारी बाराच्या सुमारास मोठी आग लागली. याठिकाणी स्क्रॅपमध्ये लाकडी ओंढक्‍यांसह इतर साहित्य असल्याने होते. नऊ गाड्या पाणी मारल्यानंतर दुपारी सव्वा एक वाजता आग अटोक्‍यात आली. 

पाहा व्हिडिओ..

नगर अभियंता कार्यालयाच्या स्क्रॅपला रविवारी दुपारी बाराच्या सुमारास अचानक आग लागली. जनता कर्फ्यू असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. शासकीय रुग्णालयासमोरील परिसरात लागलेल्या आगीच्या धूराचे लोट शहरात दूरपर्यंत दिसत होते. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेतली. गस्तीवर असलेल्या पोलिसांचे पथकही दाखल झाले. जनता कर्फ्यू असला तरी परिसरातील नागरिकांनी आगीच्या ठिकाणी गर्दी केली होती. पोलिसांनी बघ्यांना हुसकावून लावले. 

अग्निशमन दलाचे पथक येईपर्यंत आगीत बरेच साहित्य जळाले होते. याठिकाणी लाकडाचे ओंढके, जुने साहित्य, वाळलेले गवत असल्याने खूपच धूर बाहेर पडत होता. दुपारी सव्वा एकपर्यंत नऊ गाड्या पाणी मारून आग विझवण्यात आले. सर्व साहित्य भंगारातील असल्याने नुकसान झाले असे म्हणता येणार नाही असे, अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal scrap fire