नरखेडकरांनी उमेश पाटलांचे ऐकले अन्‌ विरोधकांपुढे "नोटा' नंबर वन ठरले !

प्रमोद बोडके 
Tuesday, 19 January 2021

"नोटा'च आपला उमेदवार असल्याची घोषणा उमेश पाटील यांनी केली आणि नरखेडकरांनी उमेश पाटील यांच्या "नोटा' उमेदवाराला भरभरून मतदान केले. यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या उमेदवारांची अनामत रक्कमच जप्त करण्याची किमया नरखेडकरांनी करून दाखविली. 

सोलापूर : प्रमुख वृत्त वाहिन्यांवरील डिबेटच्या माध्यमातून अवघड विषयांवर मुद्देसूदपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रभावी बाजू मांडणारे नेतृत्व म्हणून उमेश पाटील यांची महाराष्ट्राला ओळख आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले उमेश पाटील यांच्यासाठी त्यांच्या नरखेडची (ता. मोहोळ, जि. सोलापूर) यंदाची ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची आणि गावातील अस्तित्व सिद्ध करणारी होती. उमेश पाटलांनी नरखेडकरांना आवाहन केले आणि नरखेडकरांनी सोलापूर जिल्ह्यात इतिहास घडवत "नोटा'ला (वरील पैकी एकही नाही या पर्यायाला) सर्वाधिक मतदान केले. 

"नोटा'च आपला उमेदवार असल्याची घोषणा उमेश पाटील यांनी केली आणि नरखेडकरांनी उमेश पाटील यांच्या "नोटा' उमेदवाराला भरभरून मतदान केले. यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या उमेदवारांची अनामत रक्कमच जप्त करण्याची किमया नरखेडकरांनी करून दाखविली. 

नरखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग 5 सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होता. उमेश पाटील यांच्या गटाकडून वृषाली पाटील यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. संगणकीय चुकीमुळे वृषाली पाटील यांचा अर्ज अपात्र झाला. या प्रभागातील मतदारांनी "नोटा'ला मतदान करावे, असे आवाहन उमेश पाटील यांनी केले. या प्रभागातून "नोटा'ला सर्वाधिक 434 मते मिळाली. उमेश पाटील यांच्या विरोधी गटाच्या उमेदवार दीपाली कोल्हाळ यांना 143 तर सविता खंदारे यांना 163 मते मिळाली. नरखेड ग्रामपंचायतीवर उमेश पाटील यांच्या पॅनेलने 13 पैकी 12 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. उमेश पाटील यांच्या पॅनेलमधील ज्या महिला उमेदवाराचा अर्ज अपात्र झाला होता, त्या ठिकाणी मतदारांनी उमेश पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत "नोटा'ला सर्वाधिक मतदान केले आहे. 

फेर निवडणुकीबाबत दुरुस्ती करावी 
या प्रभागामधून "नोटा'ला विजयी घोषित करावे, अशी मागणी मी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसे पत्र देखील दिले आहे. 6 जानेवारी 2018 रोजी राज्य निवडणूक आयोगाने याबाबत स्वतंत्र आदेश काढून, "नोटा'ला काल्पनिक उमेदवार घोषित केले आहे. अशा परिस्थितीत सदर ठिकाणी "नोटा'ला सर्वाधिक मतदान झाल्यास, त्या ठिकाणी फेर निवडणूक घेण्याची तरतूद केली आहे. 2018 मधील नगरपालिकांच्या निवडणूक काळात हा आदेश काढला आहे. या आदेशामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा उल्लेख नाही. या आदेशात तशी दुरुस्ती करावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाला मी विनंती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी बोलावे, अशी विनंती मी केली आहे. 
- उमेश पाटील, 
प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Narkhed Gram Panchayat election Nota got more votes than the opposition candidate