esakal | राष्ट्रवादी कॉंग्रेस सोलापुरात शोधू लागली व्होट बॅंक 
sakal

बोलून बातमी शोधा

logo

महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीची कामगिरी 
निवडणूक वर्ष                विजयी झालेले नगरसेवक 

  • 2002 :              11 
  • 2007 :              14 
  • 2012 :              16 
  • 2017 :               04 

राष्ट्रवादी कॉंग्रेस सोलापुरात शोधू लागली व्होट बॅंक 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : लिंगायत, पद्मशाली आणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनाधाराचा सूर कधी सापडलाच नाही. या तिन्ही प्रमुख समाजातील नव्या पिढीच्या नेत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कधी आकर्षणच वाटले नाही. राज्यात मिळालेली सत्ता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखा प्रशासनावर वचक असलेला नेता सध्या सत्तेत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला महापालिका-जिल्हा परिषद निवडणूका खुणावू लागल्या आहेत. सोलापूर शहरातील मुस्लिम व्होट बॅंक पुन्हा एकदा आपल्याकडे मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तयारीला लागली आहे. 

माजी आमदार कै. युन्नुसभाई शेख यांच्या माध्यमातून सोलापुरातील मुस्लिम समाज पूर्वीपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहिला आहे. सक्रिय राजकारणात युन्नसभाई शेख बाजूला गेले आणि समाजही हळुहळू तुटत गेला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतून सोलापुरात आलेल्या एमआयएमने येथील अस्वस्थ मुस्लिम समाजाला राजकिय पर्याय दिला. एमआयएमाचा सर्वाधिक फटका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला. राष्ट्रवादीतील 4 ते 5 नेत्यांची एमआयएमची वाट धरल्याने महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढविणाऱ्या एमआयएमचे 9 नगरसेवक विजयी झाले. 2017 मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या खऱ्या अर्थाने नॅनो झाली. या निवडणूकीत राष्ट्रवादीचे फक्त 4 नगरसेवक विजयी झाले.

महापालिका निवडणूकीत दोन्ही कॉंग्रेसची आयत्यावेळी तुटलेली आघाडी, त्यावेळी राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपचे आकर्षण यामुळे राष्ट्रवादी सोलापुरात पुरती खचली. तौफिक शेख यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने व्होट बॅंक ताब्यात मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शेख यांच्यावर असलेल्या गंभीर गुन्ह्याचाही विषय राष्ट्रवादी पध्दतशिरपणे हताळू लागली आहे. शेख यांच्या प्रवेशामध्ये पक्षाच्या प्रतिमेचाही गांभिर्याने विचार होऊ लागला आहे. तौफिक शेख राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला यश मिळेल की नाही? या प्रश्‍नाचे उत्तर निवडणूक निकालानंतरच दिसणार आहे. परंतु कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरलेल्या एमआयएमचे खिंडार पाडण्यात सध्या तरी राष्ट्रवादीला यश मिळेल हे नक्की. 

चर्चा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याची 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील या आठवड्यात सोलापूरच्या दौऱ्यावर येण्याची दाट शक्‍यता आहे. तशा चर्चा आणि हालचालीही पक्ष पातळीवर सुरु झाल्या आहेत. या दौऱ्यात पक्ष प्रवेशाबाबत काही घडामोडी घडतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.