लॉकडाउनमुळे नीरा विक्री केंद्रे बंद

मिलिंद गिरमे 
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

महाराष्ट्रातील पहिली आणि बागायत क्षेत्रातील नीरा उत्पादनासाठी शिंदीच्या झाडांची भोंगळे यांची सर्वांत मोठी बाग आहे. नीरा उत्पादनासाठी भोंगळे यांनी 13 वर्षांपूर्वी चार हजार शिंदीच्या झाडांची बागायत लागवड केली. नऊ वर्षांपासून ते नीरेचे उत्पादन घेत आहेत. नीरा काढण्यासाठी खास कोलकता येथून बंगाली लोकांना दरवर्षी ते येथे आणतात.

लवंग (सोलापूर) : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम चालू आहे. परंतु लॉकडाउनमुळे नीरा उत्पादकांना नीरा विक्रीची केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. माळीनगर येथील नीरा उत्पादक शेतकरी निळकंठ भोंगळे आणि पृथ्वीराज भोंगळे या पिता-पुत्रांनी नीरा विक्रीला पर्याय म्हणून नीरेपासून गूळनिर्मिती चालू केली आहे. 
महाराष्ट्रातील पहिली आणि बागायत क्षेत्रातील नीरा उत्पादनासाठी शिंदीच्या झाडांची भोंगळे यांची सर्वांत मोठी बाग आहे. नीरा उत्पादनासाठी भोंगळे यांनी 13 वर्षांपूर्वी चार हजार शिंदीच्या झाडांची बागायत लागवड केली. नऊ वर्षांपासून ते नीरेचे उत्पादन घेत आहेत. नीरा काढण्यासाठी खास कोलकता येथून बंगाली लोकांना दरवर्षी ते येथे आणतात. नोव्हेंबर ते जूनपर्यंत नीरेच्या बागेची देखभाल आणि उत्पादनासाठी हे लोक येथे राहतात. यंदा या उत्पादनाला सुरवात केली आणि कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे भोंगळे यांना नीरा विक्रीची केंद्रे बंद ठेवावी लागली. त्यांनी चार-पाच वर्षांपूर्वी गूळनिर्मितीचा प्रयोग केला होता. हा गूळ डायबेटिस असणाऱ्यांना अतिशय चांगला असतो. पृथ्वीराज भोंगळे "सकाळ'शी बोलताना म्हणाले, उसाच्या रसापासून केलेल्या गुळापेक्षा नीरेच्या गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्‍स खूपच कमी असल्याने डायबेटिस लोकांना हा गूळ अत्यंत उपयुक्त व गुणकारी असतो. आम्ही शेतातच गूळ निर्मितीसाठी एक वेगळ्या प्रकारचे गुऱ्हाळ तयार केले आहे. चार हजार झाडांमधून रोज 140 ते 150 झाडांची नीरा काढतो. रोज सुमारे 500 लिटर नीरेपासून 50 किलो गूळ तयार होतो. या तयार केलेल्या गुळाची विक्री इंदापूर तालुक्‍यातील भोडणी येथील टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्मस यांच्या पुणे, मुंबई, नाशिक येथे असलेल्या स्टोअरमधून केली जाते. तसेच ऑनलाइन गुळाची विक्रीही केली जाते. नीरा विक्री थांबली तरी गूळ निर्मितीमुळे आमचे नुकसान झाले नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neera sales centers closed due to lockdown