खुशखबर... फाटक्‍या नोटांच्या बदल्यात मिळणार नव्या कोऱ्या नोटा !

Currency
Currency

सोलापूर : फाटलेल्या, जीर्ण झालेल्या नोटा दुकानदार स्वीकारत नाहीत. त्यामुळे अशा फाटक्‍या नोटा बदलून घेण्यासाठी आपसूकच नोटा बदलून देणाऱ्या एजंटांकडे पाय वळतात. तो एजंट नोटांच्या स्थितीवरून 25, 50 व 75 टक्के रक्कम कपात करून आपल्या हाती उर्वरित पैसे देतो. यामुळे नुकसान सहन करून घ्यावे लागते. मात्र, स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या बाळीवेस क्षेत्रीय कार्यालयात अशा फाटक्‍या व जीर्ण नोटा बदलून मिळणार आहेत, तीही कुठलीही रक्कम कपात न करता. यासाठी सोमवारी (ता. 27) बॅंकेमार्फत "स्पेशल ड्राईव्ह'चे आयोजन करण्यात आले आहे.

आरबीआय व एसबीआयचा संयुक्त उपक्रम
व्यवहारात बऱ्याचदा फाटक्‍या नोटा येतात. बऱ्याच जणांना खिशात नोटा कोंबून ठेवण्याची सवय असते. सतत हाताळल्यानंतर नोटांचा कागदही खराब होतो. यामुळे या नोटा बाजारात स्वीकारल्या जात नाहीत. अन्‌ या नोटा कुठे बदलून मिळतात, याबाबतही अनेकजण अज्ञान असतात. काही बॅंकाही त्या नोटा बदलून देण्याचे टाळतात. यामुळे ज्याच्याकडे फाटकी नोट आहे, त्याचे नुकसान होते. लोकांचे नुकसान होऊ नये म्हणून रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) व स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी स्पेशल ड्राईव्ह सुरू करून जुन्या, मळलेल्या, फाटक्‍या नोटा स्वीकारून तेवढ्याच मूल्याच्या नवीन नोटा वितरण करण्यात येणार आहेत. या वेळी एसबीआयच्या अधिकाऱ्यांसह आरबीआयच्या बेलापूर येथील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10.30 ते सायंकाळी पाचपर्यंत नोटा बदलता येणार आहेत. यासाठी स्वतंत्र काउंटरची सोय करण्यात आली आहे.

नाण्यांचेही होणार वितरण
बाजारात चिल्लरची वानवा असल्याने व्यावसायिक व ग्राहकांची पंचाईत होत आहे. त्यामुळे सोमवारच्या स्पेशल ड्राईव्हमध्ये लोकांना पाहिजे तेवढ्या एक, दोन, पाच, 10 रुपयांची नाणी वितरित करण्यात येणार आहेत. या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसबीआय, बाळीवेस शाखेतर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांनी घ्यावा लाभ
सर्वच शासकीय, खासगी बॅंका, पतपेढ्या व त्यांच्या शाखांनी खराब व फाटक्‍या नोटा बदलून द्याव्यात, असे आरबीआयचे निर्देश आहेत. बॅंकेच्या कामकाजाच्या कालावधीत नोटा बदलून मिळतात. बॅंकेचा खातेदार नसला तरी नागरिकांना कुठल्याही बॅंकेतून नोटा बदलून घेता येतात. याची माहिती अनेकांना नसल्याने एजंटांकडे जातात. त्यामुळे आरबीआय व एसबीआयने सोमवार स्पेशल ड्राईव्हचे आयोजन केले आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
- उदय भुरके, मुख्य व्यवस्थापक,
क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय,
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, क्षेत्रीय शाखा बाळीवेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com