धक्कादायक! "येथील' आरोग्य विभाग नाही कोरोनाबाबत गंभीर; रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिकाच नसल्याने रुग्णांसह गावकऱ्यांमध्ये संताप 

Ambulance
Ambulance

महूद (सोलापूर) : महूद (ता. सांगोला) येथील कोरोना रुग्णांना कमलापूर येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी दिवसभर रुग्णवाहिकाच आली नाही. त्यामुळे वैतागलेले कोरोनाबाधित रुग्ण प्राथमिक शाळेच्या विलगीकरण कक्षातून बाहेर पडून थेट घरीच गेले होते. त्यामुळे सांगोला तालुक्‍यातील आरोग्य विभाग कोरोना महामारीविषयी गंभीर नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

सांगोला तालुक्‍यातील महूद येथे गुरुवारी नव्याने सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे येथील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 वर पोचली आहे. या सहा जणांचा रिपोर्ट सकाळी आला. त्यामध्ये आतार गल्लीतील चार, बेघर वसाहतमधील एक व गावठाणातील एका रुग्णाचा समावेश आहे. सकाळीच अहवाल प्राप्त झालेल्या या सहाजणांना कमलापूर येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी घेऊन जाणे आवश्‍यक होते. याबाबत येथील ग्रामकृती समितीने तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून रुग्णवाहिका पाठवून देण्याबाबत कळविले होते. मात्र रुग्णवाहिका नादुरुस्त आहे, रुग्णवाहिका उपलब्ध नाही, रुग्णवाहिका अकलूजवरून येत आहे अशा प्रकारची कारणे सांगून दिवसभर व रात्री उशिरापर्यंत या रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका आलीच नाही. दरम्यान, कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांना येथील प्राथमिक शाळेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. यामधील कोरोनाबाधित रुग्ण शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून बाहेर पडला आणि गावात फिरू लागला. त्याला फिरताना पाहून नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. ग्रामस्थांनी ग्रामकृती समिती सदस्यांना याची कल्पना दिली. ग्रामकृती समितीमधील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, तलाठी, मंडलाधिकारी यांनी तत्काळ प्राथमिक शाळेकडे धाव घेतली. संबंधित कोरोनाबाधित रुग्णाला शोधून त्याला पुन्हा प्राथमिक शाळेत आणण्यात आले. 

या रुग्णांना कमलापूर येथे नेण्यासाठी दिवसभर रुग्णवाहिकेचा गोंधळ सुरूच होता. ग्रामकृती समिती सदस्यांनी विविध स्तरांवर वारंवार फोन केले. मात्र रात्री उशिरापर्यंत रुग्णवाहिका आलीच नव्हती. रात्री उशिरापर्यंत ग्रामकृती समितीमधील सदस्य शाळेच्या बाहेर बसून होते. दाट लोकवस्तीच्या भागात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तेथील सर्वच नागरिकांची रॅपिड टेस्ट घेणे, त्यांचे सर्वेक्षण करणे, वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे अशा विविध आघाड्यांवर आरोग्य विभाग गंभीर नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

याबाबत शिवसेनेचे महूद विभागप्रमुख संतोष खडतरे म्हणाले, महूदमध्ये कोरोना संसर्ग वेगाने फैलावत आहे. मात्र येथील आरोग्य विभाग गंभीर व प्रभावीपणे काम करत नसल्याने याचा धोका वाढण्याची शक्‍यता आहे. वरिष्ठांनी यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com