पंढरपुरातील कोविड हॉस्पिटलसाठी आता 65 एकराचा पर्याय 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 29 मे 2020

कमी त्रास असलेल्या रुग्णांवर उपचार शक्‍य 
एखादा व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यास त्यास तातडीने आयसीयू आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्‍यकता नसते. पंढरपुरात काल आढळलेल्या रुग्णांना किरकोळ सर्दी वगळता कसलाही गंभीर स्वरूपाचा त्रास होत नव्हता, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे असे प्रतिकार शक्ती चांगली असलेले रुग्ण काही दिवसातच ठणठणीत बरे होत आहेत. त्यामुळे 65 एकर परिसरात तात्पुरत्या स्वरूपात कोविड रुग्णालय उभारले तर येथे कमी लक्षणे असलेल्या अथवा त्रास नसलेल्या पण कोरोना बाधित रिपोर्ट आलेल्या रुग्णांना नियमित उपचारासाठी ठेवता येणे शक्‍य आहे. पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे हे अतिशय समन्वयाने आणि दक्षतेने उपायोजना करत आहेत, असे श्री. आवताडे यांनी केले आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर शहरात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. पंढरपूर शहर व परिसरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. भविष्यातील धोका कमी करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने मार्ग काढून चंद्रभागा नदीपलिकडील 65 एकर परिसरात कोविड -19 रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी संत दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याशी चर्चा केली आहे. 
श्री. आवताडे म्हणाले की, पाच दिवसांपूर्वीच पंढरपूर तालुक्‍यातील उपरी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर पंढरपूर शहरासह गोपाळपूर, करकंब येथे रुग्ण आढळले आहेत. जनकल्याण हॉस्पिटल येथे उपरी येथील रुग्णाला उपचारास दाखल करण्यास आणले होते. परंतु, परिसरात अनेक हॉस्पिटल्स, ब्लड बॅंक आणि रहिवासी असल्याने विरोध झाला. त्यानंतर प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालयातच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला. पण, एकीकडे अनेक खासगी दवाखाने बंद असल्याने शहर व ग्रामीण भागातील अन्य आजार, अपघाताचा सामना करावा लागणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय सक्षम पर्याय उरलेला आहे. येथे कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करणे चुकीचे ठरणार आहे. परिसरातील नागरिकांचा त्यास विरोध आहे. अशातच पंढरपूर शहर व तालुक्‍यात काल पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल रुग्णांची संख्या आणि होणारी गैरसोय लक्षात घेता पंढरपूरचे प्रांताधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षकांनी समन्वयाने निर्णय घेत 65 एकर परिसरात कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्राथमिक स्वरूपात दाखल करण्याची व उपचाराची सोय करण्याची व्यवस्था करावी, असे श्री. आवताडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now 65 acre option for Covid Hospital in Pandharpur